नवी दिल्ली – येत्या १ नोव्हेंबरपासून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्वच राष्ट्रीय वारसा वास्तूंच्या दर्शनासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. यात प्रामुख्याने प्रेमाचे प्रतीक असलेला आगरा येथील ताजमहाल, राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला यासारख्या वास्तूंचा समावेश आहे.
महागणार ताजमहाल, लालकिल्याचे दर्शन
या राष्ट्रीय वारसा वास्तूमधील प्रवेश शुल्क आणि चित्रीकरणासाठी आवश्यक असलेले परवाना शुल्क व अमानत रकमेत मोठी वाढ करणारी अधिसूचना पुरातत्त्व विभागाने जारी केली आहे. या अधिसूचनेवर कुणाचाही काही आक्षेप असल्यास ४५ दिवसांच्या आत त्यांनी तो नोंदवायला हवा. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून या ऐतिहासिक वास्तूंच्या दर्शनाचे दर वाढविण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्राने दिली.
सध्या ताजमहालचे दर्शन करण्यासाठी भारतीयांना केवळ २० रुपयेच शुल्क मोजावे लागते. तर, विदेशी नागरिकांना तब्बल ७५० रुपये भरावे लागते. प्रवेश शुल्कातील रकमेचा एक भाग आग्रा प्रशासन पथकराच्या स्वरूपात स्वत:कडे ठेवत असते. या दरात दुपटीने वाढ करण्यात येणार असल्याने ताजमहालच्या दर्शनासाठी भारतीयांना आता ४० रुपये आणि अन्य देशांतील नागरिकांना १२५० रुपये मोजावे लागणार आहेत.
त्याचप्रमाणे ‘क’ वर्गवारीतील वास्तूंसाठी सध्या असलेल्या १० रुपये शुल्काऐवजी भारतीयांना ३० रुपये आणि विदेशी नागरिकांना २५० ऐवजी ७५० रुपये मोजावे लागणार आहेत, असे सूत्राने सांगितले.