अखेर फेसबुक देणार ‘डिसलाईक’चा पर्याय

facebook
न्यूयॉर्क: लोकांना आवडलेल्या गोष्टीचे कौतुक करण्याचा अधिकार आहे; तसेच नावडलेल्या गोष्टीबाबत नाराजी व्यक्त करण्याचाही अधिकार आहे; असे सांगत फेसबुकवर लवकरच ‘डिसलाईक’चा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल; अशी ग्वाही फेसबुकचे मुख्य कायकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी दिली. टाऊन हॉल येथे फेसबुक वापरकर्त्यांच्या खुल्या चर्चेत ते बोलत होते.

फेसबुकवरील पोस्ट आवडल्याचे मत व्यक्त करण्याबरोबरच आवडली नसल्याचे पोस्टकर्त्याच्या निदर्शनास आणून देण्याची अनेक वापरकर्त्यांची इच्छा असते आणि तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे ही सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल; असे झुकेरबर्ग म्हणाले. ‘डिसलाईक’ सुविधा देण्यासाठी तांत्रिक बाबींवर काम सुरू असून लवकरच त्याच्या चाचण्या घेतल्या जातील आणि त्यानंतर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल; असे त्यांनी सांगितले. एखादी सहज शक्य वाटणारी बाब प्रत्यक्षात किती गुंतागुंतीची असू शकते; याचा प्रत्यय या सुविधेसाठी काम करताना आला; असेही झुकेरबर्ग यांनी सांगितले.

अशा प्रकारच्या खुल्या चर्चेतून वापरकर्त्यांची गरज, अपेक्षा आणि मानसिकता याचा अंदाज येतो आणि त्यानुसार फेसबुकवरील सेवा, सुविधा यात सुधारणा करणे शक्य होते; असे झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केले. याच महिन्यात फेसबुकच्या मुख्यालयात होणाऱ्या खुल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोदी आणि झुकेरबर्ग हे ‘कम्युनिटीज’द्वारे आर्थिक, सामाजिक समस्यांवर उपाययोजना’ या विषयावर फेसबुक वापरकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

Leave a Comment