भारतात वाढली सोन्याची मागणी; तब्बल १२० टन सोने आयात

gold
नवी दिल्ली : सोन्याच्या किंमती जागतिक बाजारात घटत असल्याने सणासुदीच्या तोंडावर भारतात सोन्याची आयात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ऑगस्टमध्ये भारताने तब्बल १२० टन सोने आयात केले. यंदाच्या आर्थिक वर्षातील हा उच्चांक आहे.

सोन्याची आयात खरोखरच सणासुदीच्या निमित्ताने करीत आहे कि त्यामागे काही अन्य कारणे आहेत, यावर केंद्र सरकार बारीक लक्ष ठेवून असल्याचेही समजते. आयातीसंदर्भात अन्य काही संकेत मिळालेच तर आयात शुल्कात तातडीने बदल केले जातील, असेही सांगितले जात आहे. सध्या सोने आयातीवर १० टक्के शुल्क आहे.

जुलैमध्ये भारताने ८९ टन सोने आयात केले होते. मात्र, ऑगस्टमध्ये १२० टन आयात केले. या आर्थिक वर्षातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी सोन्याची आयात आहे. सणाचे दिवस येत असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे.

गतवर्षी ऑगस्टमध्ये ५० टन सोने आयात झाली होती. यंदा जुलै २०१५ मध्ये ९९ टन सोने आयात झाली मात्र त्यावेळी सोन्याचे दर खूपच घसरले होते. परिणामी भारत आणि चीनकडून सोन्याची मागणी वाढली होती. भारतात दरवर्षी साधारण १ हजार टन सोने आयात केले जाते. कच्च्या तेलानंतर सोने आयातीवर भारताचा सर्वाधिक खर्च होतो असे आकडेवारी सांगते. त्यामुळे आयातीचे प्रमाण कायम राहिल्यास सोन्याच्या आयात शुल्कात वाढ केली जाऊ शकते, असे अधिका-याने सांगितले. जुलैमध्ये सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली. त्यामुळे भारत व चीनकडून सोन्याची मागणी वाढली आहे. भारत दरवर्षी एक हजार टन सोने आयात करतो. सोने व तेलामुळे भारताच्या आयात बिलावर मोठा ताण येतो. भारतात सोने हे गुंतवणुकीचे माध्यम वापरले जाते. अडचणीच्या काळात सोने वापरण्याची प्रथा आहे. भारतातील घरांमध्ये २० हजार टन रुपयांचे सोने असावे असा अंदाज आहे. सरकारने नागरिकांची सोने खरेदीची हौस पाहून सुवर्ण रोखे काढण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत घर व मंदिरातील वापरात नसलेले सोने जमा करण्यात येणार आहे. या ठेवींवर ग्राहकांना व्याज देण्यात येईल.