तिरूपतीचे यंदा दोन बह्मोत्सव

tirumala
तिरूमला तिरूपती देवस्थानात यंदाच्या वर्षात दोन ब्रह्मोत्सव साजरे होत असून त्यातील पहिला उद्यापासून म्हणजे १६ सप्टेंबरपासून साजरा होत आहे तर दुसरा १४ आक्टोबरपासून होत आहे. यंदा अधिक मास आल्याने दोन ब्रह्मोत्सव होत असल्याचे मंदिर ट्रस्टकडून सांगितले गेले आहे.या उत्सवांसाठी देशभरातून लक्षवधी भाविक तिरूपतीला येत असतात. या दिवशी निघणारी भव्य रथयात्रा हे उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. ही यात्रा रात्री काढली जाते.

ब्रह्मोत्सवासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली गेली आहे. नऊ दिवस चालणार्‍या या उत्सवात सर्वाधिक गर्दी गरूड सेवा या कार्यक्रमाला होत असते. उत्सवातील हा सर्वात महत्वाचा कार्यक्रम पाचव्या दिवशी साजरा होतो. यंदा तो २० सप्टेंबर आणि दुसर्‍या उत्सवात १८ आक्टोबर रोजी साजरा होणार आहे. या दिवशी भाविकांची संख्या ३ ते चार लाखांवर जाते. मंदिराच्या पायरी मार्गावर तसेच मंदिराकडे येणार्‍या बाकी मार्गांवर कडक पहारा ठेवला गेला असून सर्वत्र कॅमेरे लावले गेले आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उत्सवाच्या सुरवातीला येथे भेट देऊन मंदिरासाठी नवीन रेशमी कपड्यांची भेट चढवतील. चाळीस वर्षापूर्वी ही प्रथा तत्कालीन मुख्यमंत्री एम चन्ना रेड्डी यांनी सुरू केली होती.

Leave a Comment