न्यूझीलंडमधील अद्भूत डिजिटल ट्री हाऊस

treehouse
व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या जोनो विलियम्स यांनी पूर्णपणे सोलर पॉवरवर असलेले डिजिटल ट्री हाऊस बांधले असून स्कायस्पियर असे नामकरण केले गेलेले हे ट्री हाऊस जमिनीपासून ३३ फूट उंचावर आहे. गेली ३ वर्षे जोनो त्यासाठी प्रयत्न करत होते आणि ३३ लाख रूपये खर्च करून त्यांनी त्यांच्या स्वप्नातले हे घर उभे केले आहे. विशेष म्हणजे हे स्कायस्पियर जोनने स्वतःसाठी उभारले मात्र आता त्यांना अनेकांकडून त्यासाठी मागणी येऊ लागली आहे.

या घरात चमत्कार वाटावेत अशा अनेक सुविधा आहेत. या घरातून चारी बाजूचे ३६० अंशातून दर्शन घडतेच पण याचे इंटिरियर पूर्णपणे डिजिटल आहे. हे घर कुठेही नेता येते. लाईट, तापमान व साऊंड सिस्टीम खास अॅपच्या सहाय्याने दूरवरूनही नियंत्रित करता येतात. फोनवरून एक बटण प्रेस केले की गारेगार बिअर सर्व्ह केली जाऊ शकते. बिअर साठा संपत आला की अलार्म वाजतो. या घरासाठी फिंगरप्रिट सिक्युरिटी, मोटोराईज्ड दरवाजे, इनकोच बिअर फ्रिज अशा अत्याधुनिक सुविधा आहेत मात्र खर्च वाचविण्यासाठी लिफ्ट ऐवजी जिना बसविला गेला आहे. तसेच जुन्या दोराने पुलीच्या सहाय्याने वस्तू वर आणण्याची सोय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या घराला बाथरूम नाही. ती अन्य झाडावर बांधायचा जोनोचा विचार आहे.