फेसबुकवर शेअर करू नका संवेदनशील माहिती

facebook
नवी दिल्ली – फेसबुकवरून तरुणींसोबत अश्‍लील चॅट करताना दोन अधिकार्‍यांनी लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती फेसबुक पेजवर टाकल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उजेडात आल्यानंतर, सुरक्षा दलांतील कुणीही गोपनीय माहिती फेसबुक किंवा व्हॉट्‌स ऍपवर टाकू नये, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.

फेसबुक आणि व्हॉट्‌स ऍप यासारख्या प्रभावी सोशल मीडियाचा वापर करताना सीआरपीएफ आणि बीएसएफ यासारख्या केंद्रीय निमलष्करी दलातील अधिकारी व जवानांनी आपल्या हातून आपल्या दलाशी संबंधित कोणतीही गोपनीय माहिती बाहेर जाणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी, असे या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.

फेसबुकवर दोन अधिकार्‍यांनी गोपनीय माहिती टाकल्यानंतर छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित भागात तैनात असलेल्या जवानांनीही ‘अनमॅन्ड एरियल व्हेईकल’चे (युएव्ही) छायाचित्र फेसबुकवर टाकले होते. सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रकार घातक ठरणारे असल्याने या दोन्ही प्रकारांची गंभीर दखल घेऊन मंत्रालयाने सुरक्षा दलांतील जवान व अधिकार्‍यांना या संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्यास सांगितले आहे.

नक्षलविरोधी मोहिमेला बळकटी देण्याकरिता छत्तीसगडमधील सीआरपीएफच्या काही तुकड्यांना युएव्ही उपलब्ध करून देण्यात आले आहे. पण, ते फेसबुकवर आल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. सरकारने जारी केलेले हे दिशानिर्देश लष्करासोबतच, सीआयएसएफ, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, एनएसजी आणि आसाम रायफल्ससाठीही लागू आहेत, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्राने दिली.

Leave a Comment