लालबागच्या राजाचे मुखदर्शन संपन्न

lalbaug
मुंबईतील जगप्रसिद्ध लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळने शुक्रवारी भाविकांच्या लाडक्या लालबागचा राजाचा मुखदर्शन सोहळा साजरा केला. या मुखदर्शन सोहळ्यासाठीही अलोट गर्दी लोटली होती असे समजते. विशेष म्हणजे लालबागचा राजा यंदा इंदोर येथील अप्रतिम शीशमहलाच्या प्रतिकृतीत विराजमान होणार आहे. हा सेट कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बनविला आहे. शीशमहालामुळे लालबागच्या राजाच्या एकाचवेळी अनेक प्रतिमा भाविकांना नयनसुख देणार आहेत.

मुखदर्शनासाठीही भाविक येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करतातच. आठवड्याच्या कामाच्या दिवसांतही त्यासाठी अडीच ते तीन तास प्रतीक्षा करावी लागते तर सुटी दिवशी हीच प्रतीक्षा ७ ते ८ तासांवर जाते. एकदा साग्रसंगीत पद्धतीने राजाची प्रतिष्ठापना झाली की १० दिवस प्रचंड संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यात देशभरातील भाविकांबरोबरच परदेशींची संख्याही मोठी असते.या राजाच्या दर्शनासाठी १० किमी लांबीच्या रांगा लागतात आणि २४ तास रांगेत प्रतीक्षा करून भाविक त्याचे दर्शन घेतात.

लालबागचा राजा नवसाला पावणारा गणेश आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. पहाटे तीन पासूनच भाविक दर्शनासाठी येतात त्यात बॉलीवूड सेलिब्रिटींप्रमाणेच राजकारण, उद्योग, कला या क्षेत्रातील नामवंतही हजेरी लावतात.गणेश विसर्जनाचा सोहळाही पाहण्यासारखा असतो. ही मिरवणूक भायखळा व अन्य मुस्लीम वस्तींतून जाते आणि त्यावेळी सर्व धर्माचे लोक त्यात सामील झालेले असतात. उत्सव संपल्यानंतर लालबागच्या राजाला मिळालेले दान मोजण्यासाठी कांही आठवडे लागतात. परदेशी चलन, सोने चांदी, भारतीय चलन असे सर्व प्रकारचे दान दानपेटीत जमा होत असते.

Leave a Comment