तुळशीचे जनुकीय गुणधर्म शास्त्रज्ञांनी शोधले

tulsi
बंगळुरू – भारतीय संस्कृतीत तुळशीचे अनन्यसाधारण असे महत्त्व असून याचे धार्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय विज्ञानाच्या दृष्टीनेही तुळस संशोधनाचा विषय आहे. आयुर्वेदात तुळशीचे खास महत्त्व आहे. सर्दी, ताप, खोकला झाला की, घरगुती उपाय म्हणून आधी तुळशीचा काढाच घेतात. हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे वैज्ञानिकांनी तुळशीचे केलेले ‘डिकोडिंग’. म्हणजे शास्त्रज्ञांनी याची नव्याने वैज्ञानिक व्याख्या केली आहे.

तुळशीचे अधिकाधिक औषधी गुणधर्म शोधण्यासाठी विशेष संशोधन बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सच्या (एनसीबीएस) चमूने हाती घेतले आहे. तुळशीत असे अनेक घटक या शास्त्रज्ञांना आढळले की, याची मांडणी यापूर्वी कुणीच केली नव्हती. या शास्त्रज्ञांनी तुळशीचे जनुकीय (जेनेटिक) गुणधर्म निश्‍चित करणारे रोपटे लावले आहे. या नवीन तुळशीवर विविध अंगांनी प्रयोग सुरू आहेत. तुळशीतील कोणते जिन्स औषधीयुक्त घटकांना विकसित करतात, हे समजणे शास्त्रज्ञांना आता शक्य होणार आहे. त्यामुळे तुळशीचे आणखी औषधीगुण निश्‍चित करण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञांना मदत होऊ शकते.

अशाप्रकारचे संशोधन जगात पहिल्यांदाच होत आहे. तुळशीमधील संयुगे, तसेच अन्य घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. तुळस आणखी वेगळ्या प्रकारे वैद्यकीय उपचार म्हणून वापरता येईल काय, यादृष्टीने आम्ही अधिकाधिक संशोधन करीत आहोत, अशी माहिती एनसीबीएसच्या संशोधन चमूच्या प्रमुख सौदामिनी रामनाथन् यांनी दिली. या संशोधनात सीसीएएमपी आणि लाईफ सायन्स क्लस्टरचे सदस्यही सहभागी झाले आहेत.

शास्त्रज्ञांनी युरोसोलिक ऍसिडचे डिकोडिंग केले. तुळशीतील हा घटक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या युरोसोलिक ऍसिडच्या विश्‍लेषणासाठी शास्त्रज्ञांनी आधुनिक सिंथेटिक जैवविज्ञान तंत्रज्ञानाचा आधार घेतला, तर अधिकाधिक लाभ होईल, असे आयएनएसटीईएमचे एस. रामास्वामी यांनी सांगितले.

शास्त्रज्ञांच्या चमूने जीनोमिक डेटा अर्थात तुळशीतील जनुकांची माहिती संकलित करण्यासाठी तुळशीच्या पाच प्रकारांचा वापर केला आहे. यात त्यांना arabidopsis thaliana हा घटक आढळला. विशेष म्हणजे कृष्णतुळस या प्रकारात हा घटक आढळला. तुळशीवरील हे संशोधन भविष्यात अनेक रोगांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Comment