सात भारतीय आशियातील दानशूरांच्या यादीत

forbes
ह्युस्टन – आशियातील दानशूरांची नववी यादी नुकतीच ‘फोर्ब्ज’ या नियतकालिकाने प्रकाशित केली. यात सात भारतीयांचा समावेश असून फोर्ब्जने आपल्या यादीत परोपकार कार्यासाठी मोलाचे योगदान देणार्‍या आशियातील १३ देशांचा समावेश केला आहे. ज्या सात भारतीयांचा यादीत समावेश आहेत, त्यापैकी चार जण देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक आहेत.

दानशूर लोकांच्या यादीत मूळचे केरळचे असलेले प्रख्यात उद्योगपती सनी वारके यांना अव्वल स्थान देण्यात आले आहे. वारके यांनी बिल गेट्‌स आणि वॉरेन बफेट यांनी सुरू केलेल्या ‘गिव्हिंग प्लेज’ (संपत्तीतील एक भाग कल्याणकारी कार्यासाठी दान करणे) परंपरेचे पालन करताना गेल्या वर्षी जूनमध्ये आपल्या संपत्तीतील अर्धा भाग, अर्थात २०२५ अब्ज डॉलर्स जनकल्याणासाठी दान करण्याची घोषणा केली होती.

दुबईत वास्तव्यास असलेले वारके जीईएमएस एज्युकेशनचे संस्थापक आहेत. या संस्थेच्या १४ देशांमध्ये एकूण ७० शाळा आहेत. त्यांच्याशिवाय इन्फोसिसचे सहसंस्थापक सेनापती गोपालकृष्णन्, नंदन नीलेकणी आणि एस. डी. शिबुलाल यांनादेखील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या व्यक्तिगत योगदानामुळे यादीत स्थान मिळाले आहे.

इन्फोसिसचे अन्य एक सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांचे पुत्र रोहन यांचे नावही या यादीत आहे. त्यांनी भारतीय प्राचीन साहित्याचा प्रचार करण्यासाठी हॉवर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला ५२ लाख डॉलर्स दिले आहेत. सोबतच, सुरेश रामकृष्णन् आणि महेश रामकृष्णन् या भावांचाही यादीत समावेश आहे. दोन्ही भाऊ लंडनमध्ये प्रख्यात उद्योगपती म्हणून ओळखले जातात. भारतातील सुमारे चार हजार नागरिकांना शिवण प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी ३० लाख डॉलर्स दान केले आहे. २००४ च्या त्सुनामी पीडित महिलांना यामुळे मोठा फायदा झाला होता.

Leave a Comment