वैज्ञानिकांनी उंचावली भारताची मान; पंतप्रधानांचे प्रतिपादन

modi
नवी दिल्ली – मला खरोखरच आपल्या अंतराळ वैज्ञानिकांचा अभिमान वाटतो. मंगळ मोहीम यशस्वी करून आणि अन्य अतिशय कठीण टप्पे गाठून त्यांनी भारताला जगात सन्मान प्राप्त करून दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

आपल्या अंतराळ वैज्ञानिकांनी भारताची मान तर उंचावलीच, शिवाय अनेक देशांमधील उपग्रहांना अंतराळात पाठवून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही मानाचे स्थान मिळविले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी वैज्ञानिकांशी चर्चा करताना सांगितले. मंगळ मोहीम आणि अन्य मोलाचे टप्पे आपण गाठले आहे. पण, आपल्याला इथेच थांबता येणार नाही. तंत्रज्ञानाचा आणखी योग्य वापर करून त्याचे फायदे गरिबातील गरिबाला मिळावे, यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहे. हे फार मोठे आव्हान आहे. आपले वैज्ञानिक हा टप्पाही सहज गाठतील, असा मला विश्‍वास आहे, असे सांगताना ते म्हणाले की, देशवासीयांना फायदा मिळावा, यासाठी वैज्ञानिकांनी नेहमीच काहीतरी नवीन प्रयोग करायला हवे. अंतराळ संशोधन विभागातर्फे या एक दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित होते.

Leave a Comment