ताजा गणनेतील माहिती; भारतात सुमारे १४ हजार बिबटे

leopard
नवी दिल्ली – व्याघ्र गणनेचीच पद्धत वापरून देशात बिबट्यांचीही गणना करण्यात आली असता, यातून अतिशय आनंदाची बातमी बाहेर आली आहे. भारतात सुमारे १४ हजार बिबटे असल्याचे या गणनेत आढळून आले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्राने दिली आहे.

देशात किती बिबटे आहेत, याची मोजणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्याघ्र गणनेत जी पद्धत वापरण्यात आली, त्याच पद्धतीने बिबट्यांचे छायाचित्रण आणि त्यांच्या अस्तित्वाचे इतर पुरावे गोळा करण्यात आले. व्याघ्र गणना मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ यादवेंद्र देव यांच्या नेतृत्वात बिबट्यांची गणना करण्यात आली. यात देशाच्या विविध भागांत असलेल्या बिबट्यांची सविस्तर माहिती उपलब्ध झाली. शिवालिक टेकड्या, उत्तर व मध्य भारत तसेच पश्‍चिम घाटाचा अंतर्भाव असलेल्या सुमारे साडेतीन लाख किमी क्षेत्रफळ भागाचा यात अभ्यास करण्यात आला.

या पाहणीचा बारकाईने अभ्यास करण्यात आल्यानंतर शिकार करण्यात निष्णात असलेल्या बिबट्यांची संख्या सुमारे १४ हजारांच्या घरात असल्याचे सिद्ध झाले. बिबट्यांची ही संख्या अतिशय समाधानकारक असल्याचे सरकारचे मत असल्याचे सूत्राने सांगितले.

Leave a Comment