दररोज किमान तीन ते चार नवे स्मार्टफोन बाजारात सादर केले जात असले तरी एकंदरीत युजरना स्मार्टफोन बोअर वाटत असल्याचेही दिसून येऊ लागले आहे. स्मार्टफोनसंदर्भातले आकर्षण कायम राहावे यासाठी अनेक कंपन्या प्रयत्नशील असून स्मार्टफोन क्षेत्रात अनेक क्रांतीकारी बदल होत असल्याची नांदी सुरू झाली आहे.
स्मार्टफोन कल्पनेपलिकडे बदलणार
सर्वात मोठी क्रांती स्मार्टफोन बॅटरीत अपेक्षित आहे. सध्याच्या स्मार्टफोनमध्ये कमी बॅटरी लाईफ हा मोठाच प्रश्न आहे. त्यावर उत्तर म्हणून अवघ्या काही मिनिटांत चार्ज होणार्या आणि १५ दिवसांचा बॅकअप देणार्या बॅटर्या येऊ घातल्या आहेत. इंटरनेटचा स्पीड ही दुसरी समस्याही सुटण्याच्या मार्गावर असून संपूर्ण चित्रपट ३ सेकंदात डाऊनलोड होऊ शकेल इतका इंटरनेट स्पीड युजरला उपलब्ध होणार आहे.
बॅटरीसाठी नॅनो बॅटरीचा पर्याय तपासला जात असून ही बॅटरी सध्याच्या बॅटरीपेक्षा खूपच छोटी असेलच पण परफॉर्मन्सला ती उत्तम असेल कारण त्यामुळे थ्रीडी प्रिंटींगही घेता येईल. स्क्रीनबाबत फोल्ड करता येतील असे स्क्रीन यापूर्वी एलजीने आणले आहेत मात्र नवीन संशोधनात हे स्क्रीन तीन भागात फोल्ड करता येतील व त्याच्या पेटंटसाठी अर्जही केला गेला आहे. थ्री फोल्ड स्क्रीनवाले फोन २०१७ च्या सुमारास बाजारात येतील असे सांगितले जात आहे. मॅजिक टच हे त्यांचे वैशिष्ठ असेल आणि खरोखरच जादू केल्याचा अनुभव त्यामुळे मिळू शकेल व तो क्लीक करण्यापेक्षा वेगळाही असेल. ब्रेल लिपी उपलब्ध होत आहेच पण केवळ स्पर्शान स्क्रीनवर काय आहे हेही जाणून घेता येणार आहे. टेक्सस नावाची कंपनी यावर काम करत आहे.
फोरजी सेवेचे बस्तान अजून पुरेपणाने बसलेले नाही मात्र फाईव्ह जीचे इंजिन सुरू झाले आहे. अर्थात त्यासाठी२०२० पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल मात्र त्याचा इंटरनेट स्पीड सध्याच्या ७० पट अधिक असेल. प्रोजेक्ट आरा या गुगलच्या योजनेनुसार युजरच्या गरजेनुसार मॉड्यूलर फोन तयार करून मिळतील. थ्री डीची क्रेझ टिव्हीबाबत कमी होताना दिसत असली तरी नवीन तंत्रज्ञानामुळे मोबाईलवर त्याची क्रेझ कायम राहील असाही दावा केला जात आहे. एचटीसी व एलजीने २०११ साली या संदर्भात प्रयत्न केले होते मात्र ते यशस्वी झाले नव्हते.भविष्यात नवीन स्मार्ट स्क्रीन टेक्नॉलॉजी हा बदल घडवेल असेही सांगितले जात आहे.