मुंबई- बनावट नोटा चलनात येऊ नये म्हणून भारतीय रिझर्व्ह बॅंक आणि सेक्युरिटी प्रिंटींग अॅंड मिंटींग कार्पोरेशन ऑफ इंडियाने कडक पावले उचलली असून आरबीआयने ५०० आणि १००० च्या नोटांसाठी नवीन क्रमांक पद्धती आणि इतर सात फीचर्स लागू केली आहेत.
आरबीआय बनावट नोटांना रोखण्यास सज्ज, नवीन क्रमांक पद्धतीचा वापर
१०० च्या नोटांनाही ही पद्धत काही दिवसानंतर लागू केली जाणार आहे. बनावट नोटांवर काउंटरफीट नोट असा शिक्का मारण्यात यावा असा आदेश आरबीआयने बँकांना दिला आहे. ज्या बॅंका या आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच ज्या ग्राहकाकडून ती नोट आली त्याला पावतीसुद्धा देण्यात यावी असे आरबीआयने सांगितले आहे. पाकिस्तानच्या मार्गाने येऊन बनावट नोटा भारतात पसरविल्या जातात. या मार्गावर सुरक्षा एजन्सीजचे बारीक लक्ष आहे. पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळच्या सीमेहून भारतात बनावट नोटा येतात. तसेच इतर सीमांहूनही हा धोका वाढल्याने आरबीआयने त्यावर चिंता व्यक्त केली आहे. मलेशिया, थायलॅंड, ओमान या देशातूनही भारतात बनावट नोटा आणल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर कुरिअर सर्व्हिसेसच्या माध्यमातून बनावट नोटा देशात येतात असे देखील सांगण्यात आले आहे.