नवी दिल्ली – आयकर खात्याने कर बुडवून अमाप संपत्ती जमा करणार्या लोकांची किंवा त्यांच्या संपत्तीची माहिती देणार्या देशातील कोणत्याही नागरिकाला १५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची आणि त्याचे नावही गुप्त ठेवण्याची नवी योजना जाहीर केली आहे.
आयकर खात्याची नवी योजना; काळ्या पैशाची माहिती द्या, मिळवा १५ लाख
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने गेल्या आठवड्यात देशभरातील आपल्या सर्व अधिकार्यांना या संदर्भातील नवीन नियमावली आणि दिशानिर्देश जारी केले आहेत. आयकर खात्याने करबुडव्यांच्या काळ्या यादीत ज्याचे नाव टाकले आहे, त्याच्याविषयीची खात्रीलायक माहिती देणार्या किंवा काळा पैसा जमविणार्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करणे शक्य होईल, अशी माहिती देणार्या कोणत्याही नागरिकाला १५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे या नियमावलीत स्पष्टपणे नमूद आहे.
यापूर्वीच्या आणि चालू आर्थिक वर्षापासून ही नियमावली लागू करण्यात आली आहे. सरकारचा महसूल वाढविण्यासोबतच काळ्या पैशाची किचकट होत चाललेली समस्या हाताळून देशातच लपविण्यात आलेला अमाप काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याची माहिती आयकर खात्यातील एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.
काळा पैसा जमविणार्यांची माहिती देणार्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली जाईल. कायद्याच्या दृष्टीने जिथे आवश्यक आहे, तिथेच त्याच्या ओळखीबाबतचे दस्तावेज सीलबंद लिफाप्यातून सादर केले जातील, असेही यात स्पष्ट करण्यात आले.