५५० लाखापर्यंत वाढविणार विमा लाभ योजना

epfo
नवी दिल्ली – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अर्थात ईपीएफओ कर्मचारी मुदत ठेवीशी संबंधित विमा योजनेंतर्गत कर्मचार्‍यांना मिळणारी रक्कम ५.५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे. या योजनेंतर्गत कर्मचार्‍यांना सध्या ३.६० लाख रुपयांची रक्कम मिळत आहे.

ईपीएफओने आपल्या सुमारे सहा कोटी सदस्यांना विम्याच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ईपीएफओच्या पेन्शन आणि ठेवीवर आधारित विमा योजना समितीची बैठक येत्या ९ तारखेला होणार असून, त्यात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्राने दिली.

समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव ईपीएफओबाबत निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार असलेल्या केंद्रीय विश्‍वस्त मंडळापुढे सादर करण्यात येईल. मंडळाची मोहर उमटल्यानंतर श्रम मंत्रालय त्याबातची अधिसूचना जारी करेल आणि नंतर त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल, असेही सूत्राने सांगितले.
सद्यस्थितीत एकाच कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍याचे एक वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर निधन झाले, तर ईपीएफओतर्फे त्याला त्या एक वर्षाच्या काळात मिळालेल्या सरासरी वेतनाच्या २० पट रक्कम आणि त्यावर २० टक्के बोनस देण्यात येतो. कर्मचार्‍याची मासिक वेतन मर्यादा १५ हजार रुपये असेल, तर त्या कर्मचार्‍याला किमान ३.६० लाख रुपये इतकी रक्कम दिली जाते. आता या रकमेत ३० टक्क्यांनी वाढ करून ती ५.५० लाख रुपये करण्याचा ईपीएफओचा प्रस्ताव आहे.

Leave a Comment