दरमहा ३६ लाख ग्राहक घेतात पोर्टेबिलिटीचा आधार

mobile
नवी दिल्ली : मोबाईल ग्राहक कॉल ड्रॉप आणि मोबाईल फोन सेवेच्या खराब गुणवत्तेमुळे एक कंपनी सोडून दुस-या कंपनीचा आधार घेत असून दरमहा ३६ ग्राहक आपली कंपनी बदलत आहेत. मात्र, त्यांना एकही कंपनीकडून समाधानकारक सेवा मिळत नसल्यामुळे मोबाईल कंपनी बदलण्याचे प्रमाण वाढले आहे.

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या आकड्यावरून ही माहिती होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत १६ कोटींपेक्षा अधिक ग्राहकांनी मोबाईल कंपनी बदलली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थानमधील ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात ३६.७८ लाख लोकांनी मोबाईल कंपनी बदलण्यासाठी अर्ज केला आहे, तर मे महिन्यात ३२.४० लाख लोकांनी अर्ज केला होता. या अमाप अर्जामुळे ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार सेवेची पुर्तता करणे मोबाईल कंपन्यांना कठीण चालले आहे.

ट्रायशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल कंपन्या बदलण्याचा मुख्य उद्देश कॉल ड्रॉप, नेटवर्क आणि बिलाशी संबंधित अन्य तक्रारी आहेत. पण हे ग्राहक एका ठराविक कंपनीचेच कार्ड घेत नाहीत, तर सर्वच कंपन्यांचे ग्राहक नव्या कंपनीची सेवा स्वीकारू लागले आहेत. त्यामुळे कार्ड घेण्यासाठी वाढते अर्ज ही एक कंपन्यांसमोरील समस्या बनली आहे. त्यामुळे सेवेची पूर्तता करण्यास उशीर होत आहे. जुलै महिन्यापासून मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवा देशभरात सुरू झाली आहे. त्यामुळे कंपनी बदलण्याची आकडेवारी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. आताची जी आकडेवारी आहे, ती जूनपर्यंतची आहे. जूनपर्यंत एका नेटवर्क झोनमधूनच नंबर पोर्ट होत होते. मात्र, आता देशभरात पोर्टेबिलिटी लागू झाल्याने आता मोबाईल कंपनी बदलण्याच्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे, असे ट्रायने म्हटले आहे.

Leave a Comment