तीन लाख कोटींपेक्षा अधिक पृथ्वीवर वृक्ष

tree
वॉशिंग्टन – सुंदर व भव्य निसर्गाचे चर्णन संत तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती… असे केलेले आहे. भौतिक व औद्योगिक विकासाच्या नावाखाली निसर्गाची ही अमूल्य संपदा नष्ट होत आहे किंवा केली जात आहे. मात्र, तरीही आज या पृथ्वीतलावर ३ लाख कोटींपेक्षा अधिक वृक्ष अस्तित्वात असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे.

मानवी संस्कृतीची सुरुवात झाल्यापासून जगात जेवढे वृक्ष अस्तित्वात होते, त्यात ४६ टक्क्यांनी कपात झाली आहे. सोप्या शब्दात ४६ टक्के वृक्ष नष्ट झाले आहेत. पृथ्वीवर तीन लाख कोटींपेक्षा अधिक वृक्ष आहेत, असा अंदाज यापूर्वीही वर्तविण्यात आला होता. मात्र, अंदाजापेक्षा हे प्रमाण साडे सात टक्के अधिक आहे. आधी पृथ्वीवर ४ लाख कोटी वृक्ष असल्याचा दावा करण्यात आला होता. संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय चमूने उपग्रहाकडून मिळालेली छायाचित्रे, जंगलांची यादी आणि सुपर कंप्युटर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जगातील वृक्षांचा अचूक अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधन चमूचे प्रमुख, ख्यातनाम लेखक आणि येल स्कूल ऑफ फॉरेस्ट्री ऍण्ड एन्व्हायर्नमेंटल स्टडीजचे फेलो थॉमस क्राऊथर यांनी सांगितले की, पृथ्वीवर वृक्ष सर्वात प्रमुख आणि नाजूक अशी निर्मिती आहे. मात्र, त्यांच्याविषयी आधी एवढी सखोल माहिती नव्हती. पण, आधुनिक तंत्रज्ञान व साधने यांच्यामुळे आम्ही वृक्षांबाबत अधिकधिक ज्ञान प्राप्त करीत आहोत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वाखाली विशेष पर्यावरण कार्यक्रम राबविला जात आहे. ‘बिलियन ट्री कॅम्पेन’ नावाने ओळखले जाणारे हे अध्ययन त्यातीलच एका उपक्रमाचा भाग आहे. दोन वर्षांपूर्वीच अशाप्रकारच्या संशोधनाची आवश्यकता प्रतिपादित करण्यात आली होती. क्षेत्रीय आणि जागतिक स्तरावर किती झाडे आहेत, याचा अंदाज वर्तविण्यास संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितले होते. भविष्यात किती वृक्षारोपण करायचे, याचे लक्ष्य निर्धारित करण्यासाठी हे संशोधन हाती घेण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी म्हणजे संशोधनास आरंभ होण्यापूर्वी पृथ्वीवर ४०० अब्ज झाडांचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, त्याहून कितीतरी अधिक म्हणजे तीन ट्रिलियन झाडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment