नागा साधूंचे १७ श्रृंगार

naga
भारतीय संस्कृतीत श्रृंगाराचे एक आगळे महत्त्व आहे. मात्र श्रृंगार म्हटला की तो महिलावर्गाची मक्तेदारी समजली जाते. महिलांसाठीचे सोळा श्रृंगार भारतीय संस्कृतीत आहेतच. मात्र सर्वसंग परित्याग करून साधू बनलेल्या नागा साधूंनी या बाबतीत महिलांना मागे टाकले आहे याची कदाचित आपल्याला माहिती नसेल. महिलांचे सोळा तर या नागा साधूंचे १७ श्रृंगार आहेत. महिला ज्याप्रमाणे कांही ठराविक निमित्ताने नटतात तसेच नागा साधूही कांही ठराविक पर्वणीतच हे सतरा श्रृंगार करतात. त्यात कुंभमेळा ही मुख्य पर्वणी असते. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे जमलेले नागा साधू या सतरा श्रृंगारांनी सजलेले आहेत.आणि अशा सतरा श्रृंगारांनी नटलेल्या नागा साधूंचे दर्शन हे अनेक जन्मांचे पुण्य देणारे असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

नागा साधू हे दिगंबर म्हणजे नागवे असतात. त्यामुळे श्रृंगाराचे मुख्य साधन जो कपडा तो यात नाही. मात्र या सतरा श्रृंगारांनी नागा साधू त्यांची इष्ट देवता भोलेनाथ व विष्णु यांची पूजा करतात. नागा साधूंच्या या सतरा श्रृंगारात लंगोट, भभूत, चंदन, पायात लोखंडी वा चांदीचे कडे, कमंडलू, जटा, तिलक, कमरेला फुलाच्या माळा, काजळ, हातात कडी व रूद्र्राक्ष माळा, अंगणी, पंचकेश, डोक्यावर रोळीचा लेप, कुंडले, हातात चिमटा, डमरू व भस्माचा सर्वांगाला लेप यांचा समावेश असतो. अंगावर कपड्याऐवजी सफेद भस्माचा लेप हे साधू देतात. वस्त्र धारण करण्याची या साधूंना परवानगी नाही मात्र करायचेच असेल तर गेरू रंगाचे एकच वस्त्र ते परिधान करू शकतात. नागा साधूंची इष्ट देवता भगवान शंकर ११ हजार रूद्राक्ष माळा परिधान करतात असा समज असल्याने नागा साधूही रूद्राक्ष माळा घालतात असे समजते.