दिल्ली- बुधवारी देशभरातील १५ कोटींहून अधिक कर्मचार्यांनी केलेल्या एक दिवसीय संपामुळे देशाचे किमान २५ हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचा अंदाज असोचेमने व्यक्त केला आहे. या संपाचा सर्वाधिक फटका बँका, वाहतूक व कोळसा खाण क्षेत्राला बसला असल्याचेही सांगितले जात आहे. असोचेमचे महासचिव डी.एस.रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार या संपामुळे देशातील आवश्यक सेवा विस्कळीत झाल्या तसेच निर्यातदारांना त्याचा मोठा फटका बसला. कोळसा उत्पादन, बँक सेवा आणि वाहतूक कोलमडल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर मार्ग काढणे आवश्यक असले तरी हा प्रश्न चर्चेतून सोडविला गेला पाहिजे असेही ते म्हणाले.
कर्मचार्यांच्या देशव्यापी संपामुळे २५ हजार कोटींचे नुकसान
सीसीआय चे अध्यक्ष सुमीत मुजुमदार या संपाबाबत बोलताना म्हणाले, संपामुळे होणार्या नुकसानीचा परिणाम हा कांही काळापुरता असतो मात्र या संपामुळे भारताचे आकर्षक गुंतवणूक स्थान अशी जी प्रतिमा निर्माण केली जात होती त्या प्रतिमेला धक्का बसला आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. कामगार कायदा सुधारणा आवश्यक आहेत, मात्र त्यासाठी संप हे उत्तर असू शकत नाही. भारताची अर्थव्यवस्था देशव्यापी संपासारखे आर्थिक अडथळे सहन करू शकणार नाही त्यामुळे कामगार प्रश्न सोडविण्यासाठी युनियन आणि सरकार व उद्योग जगत यांनी एकत्र येऊनच मार्ग शोधणे आवश्यक आहे. बँकांच्या कामावर परिणाम झाल्याने व्यावसायिकांच्या उलाढालीही मंदावल्या असेही ते म्हणाले.