करबुडव्यांची माहिती द्या -१५ लाखांचे इनाम मिळवा

tax
दिल्ली- करचुकवेगिरी करणार्‍याची माहिती देणार्‍यासाठी केंद्र सरकाच्या अर्थ मंत्रालयाने खात्रीशीर माहिती देणार्‍या लोकांना १५ लाख रूपयांपर्यंतच इनाम देण्याची योजना जाहीर केली आहे. यामुळे टॅक्स चोरी करणारे बडे मासे गळाला लागतील व सरकारच्या महसूलातही लक्षणीय वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वास्तविक करबुडव्यांची माहिती देणार्‍याना रोख इनाम देण्याची योजना तशी जुनीच आहे मात्र बडे मासे गळाला लागावेत यासाठी ही घोषणा पुन्हा केली गेली असून त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे अर्थ मंत्रालयाने २६ ऑगस्टला जारी केली आहेत.

यानुसार करबुडव्यांची खरी माहिती देणारे बक्षीसाचे हक्कदार असतील. अर्थात करबुडव्यांची माहिती कायदेशीर कारवाई करता येईल इतक्या विस्ताराने दिली गेली पाहिजे असे जाहीर केले गेले आहे. यामध्ये अगदी धनाढय करबुडव्यांची माहितीही दिली गेली तरी माहिती देणार्‍याला एकूण कर रकमेच्या १० टक्के रकमेपेक्षा जास्त बक्षीस दिले जाणार नाही असेही स्पष्ट केले गेले आहे. अर्थात कांही अपवादात्मक केसेसमध्ये आयकर अधिकार्‍यानी शिफारस केली तर बक्षीस रककम वाढविली जाणार आहे.

Leave a Comment