दीव बेटाची यादगार सहल

div
गुजराथेतील छोटीशी पण अतिसुंदर दीव दमण बेटे पर्यटकांसाठी खास आकर्षण आहेत. त्यातील केवळ ३८ किमीचा परिसर असलेले दीव बेट तर निसर्गसौदर्याची जणू खाण आहे. प्रदूषणमुक्त स्वच्छ हवेचा लाभ घ्यायचा असेल तर या बेटाला भेट द्यायलाच हवी.

या छोट्याशा बेटावर भेट देण्याजोगी अनेक स्थळे आहेत. दीवचा किल्ला त्यातील प्रमुख स्थळ. गुजराथेतील खंबाताचा राजा बहादूर शहा याने हा किल्ला बांधला व नंतर त्यात पोर्तुगीजांनी अनेक बदल केले. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला हा किल्ला दिल्लीतील लाल किल्ल्यापूर्वी १०० वर्षे बांधला गेल्याचे सांगितले जाते. किल्ल्यावरून आसपासचे दृष्य आणि समुद्राचे नयनमनोहर दर्शन घडते. किल्ल्यावर आजही अनेक तोफा आहेत त्यातील अष्टधातूची तोफ विशेष आहे.ऐन उन्हाळ्यातही ही तोफ गरम होत नाही. प्रकाशस्तंभावरूनही आसपासचा नजारा न्याहाळता येतो.

१६१० साली बांधले गेलेले सेंट पॉल चर्च पोर्तुगीज स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. येथे येशूची संगमरवरी मूर्ती आहे. पाणीकोट दुर्गाला जाण्यासाठी मोटरबोट आवश्यक आहे. गंगेश्वर आणि जलंदर मंदिरेही आवर्जून पहावीत अशी. गंगेश्वर येथील खडकात शिवलिंग असून तेथे समुद्राचा लाटा अलवार येऊन फुटतात.जणू शिवलिंगाला अभिषेकच करतात. जलंदर बीचवर चंडिका देवी मंदिर छोट्या टेकडीवर आहे. आसपासचे डोंगर आणि सुंदर समुद्रकिनारा ही या बेटाची खास सौंदर्यस्थळे आहेत. नगोआ बीच व चक्रतीर्थ बीचही देखणे असून चक्रतीर्थ बीचवरून सुंदर सूर्यास्त पाहता येतो. फक्त या बेटावरच होम्का ताडाची झाडे आढळतात. ही झाडे उंच वाढल्यानंतर त्याला दोन फांद्या फुटतात.

या बेटावर जाण्यासाठी पोरबंदर, मुंबई, अहमदाबाद येथून विमानसेवा आहे तसेच रेल्वेसुविधाही आहे. बस, टॅक्सी अथवा खासगी कारनेही येथे जाता येते. राहण्यासाठी उत्तम सुविधा आहेत आणि सीफूड, कॉन्टीनेन्टल, साऊथ इंडियन,नॉर्थ इंडियन . चायनीज असे सर्व प्रकारचे जेवण मिळते. वर्षभरात कधीही या बेटांवर जाता येते.

Leave a Comment