दुर्मिळ प्रजातीतील उदमांजर ब्रिटनमध्ये आढळले

udmanjar
ब्रिटन आईल्स मधून नामशेष झाल्याचे मानले जात असलेले पोल कॅट – उदमांजराच्या अस्तित्वाचे संकेत फेब्रुवारीत मिळाले आहेत. निसर्गतज्ञांनी उदमांजर या भागात पुन्हा अस्तित्त्वात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे कारण १९६० च्या सुमारास ही मांजरे मृतावस्थेत या भागातील रस्त्यांवर आढळली होती त्यानंतर ती दिसली नव्हती.

ब्रिटीश आईल्स हा ६ हजार बेटांचा समूह आहे आणि त्यात आयर्लंडचाही समावेश होतो.पोल कॅट ही हायब्रीड प्रजाती कोंबड्यांची शिकार करणारी आहे. ब्रिटनमध्ये या भागात अंडी देणार्‍या कोंबड्या ही मांजरे मारत असत त्यामुळे लोकांनीच या मांजरांची शिकार मोठ्या प्रमाणावर सुरू केली होती. ही मांजरे इतक्या मोठ्या प्रमाणावर मारली गेली की त्यामुळे ती दुर्लभ प्रजातीत समाविष्ट करावी लागली होती. ६० च्या दशकांत कांही ठिकाणी रस्त्यावर ती मरून पडलेली आढळली होती तर उत्तर पूर्व भागात ती अगदी क्वचितच दिसत असत.

हा प्राणी मुळातच निशाचर आहे. त्यामुळे दिवसा ती दिसत नाहीतच. त्यातही थंडीत ती रस्त्यांवर बरेचवेळा वाहनांखाली चिरडून मेल्याचे आढळत असे. आता मात्र पुन्हा ही मांजरे ब्रिटीश आईल्समध्ये दिसू लागली आहेत. मे महिना त्यांच्या प्रजननाचा काळ असतो. ही मांजरे बेडुक, चिमण्या, उंदीर, ससे कोंबड्या खातात. विशेष म्हणजे त्यांच्या गुदद्वारातून कस्तुरीसारखा सुगंध येतो म्हणूनच त्यांना उदमांजर म्हटले जाते.