घाबरु नका, शेअर बाजार नक्की स्थिरावेल -अरुण जेटली

arun-jaitley
नवी दिल्ली – भारतीय शेअर बाजाराला सोमवारी आशियाई बाजारपेठेतील घसरणीचा मोठा फटका बसला असुन मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी १,६२४ अंशांची घसरण नोंदवत बाजार आज २५ हजार ७४१ अंशापर्यंत खाली घसरला असला तरी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबद्दल घाबरण्याचे असे काहीच कारण नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला व्यक्त करण्यात आलेल्या विकासाच्या अंदाजानुसार आगामी काळात मान्सूनच्या समाधानकारक प्रमाणामुळे मागणी आणि आर्थिक उलाढाल नक्की वाढेल. त्यामुळे शेअर बाजारही स्थिरावेल. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून लक्षपूर्वकरित्या परिस्थिती हाताळली जात आहे, असे अरुण जेटली यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या उतार-चढावामुळे येथील शेअर बाजाराची घसरण झाली. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत अजिबात नाही. हा चीनमध्ये आलेल्या मंदीच्या लाटेचा परिणाम आहे. जागतिक बाजारपेठेचा आपण भाग असल्यामुळे आपल्यावरही काही प्रमाणात मंदीचा परिणाम हा होणारच परंतु, ही घसरण जास्त काळ टिकणार नाही, असेही जेटली पुढे म्हणाले.

Leave a Comment