आता रात्रीही बघता येणार ताजमहाल

tajmahal
आग्रा – आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल आता रात्रीही बघता येणार असून, यासाठीची ई-तिकीट सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

यासाठी तिकिटाचे आगाऊ आरक्षण करण्याऐवजी, आता पर्यटक ज्या दिवशी ताजमहालला भेट देतील त्याच दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत ऑनलाईन आरक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव पारित करण्यात आला असून, संबंधित आदेश लवकरच जारी केले जातील, अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रात्री ८.३० ते १२.३० वाजेपर्यंत पर्यटकांना ताजमहाल बघण्याचा आनंद लुटता येणार असून, भेटीचा अवधी अर्ध्या तासाचा आहे. ताजमहालला रात्री भेट देण्याची सोय पौर्णिमेच्या आधी दोन दिवस व नंतर दोन दिवस आणि पोर्णिमेचा दिवस असे एकूण पाच दिवसच उपलब्ध आहे. सध्या या ऐतिहासिक वास्तूला रात्री भेट देण्यासाठी पर्यटकांना पूर्वेकडील दरवाजातून पाठविण्यात येते. पण, यामुळे स्थानिक लोकांना त्रास होत असल्याने, त्यांना पश्‍चिमेकडील दारातून प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणामुळे रात्री ताजमहाल बघण्याची परवानगी अनेक पर्यटकांना नाकारण्यात येते. यासाठी मेहताब बाग येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे, जेणेकरून पर्यटकांना त्यांच्या सोयीनुसार रात्री ही ऐतिहासिक वास्तू बघता येईल.

Leave a Comment