सार्वजनिक बँकांमध्ये हजारो नोक-या

jobs
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये हजारो रिक्त पदे भरण्यात येणार असून सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांमध्ये येत्या दोन वर्षांमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. कारण येत्या दोन वर्षांत अधिकारी व कर्मचारी मिळून या बँकांमधून तब्बल ८० हजार जण निवृत्त होणार आहेत. तसेच नव्याने कर्मचारी भरती करताना नियमांमध्ये लवचिकतेचे धोरण अवलंबिले जाणार आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांमधील ३९ हजार ७५६ कर्मचारी निवृत्त होतील. त्यात १९ हजार ६५ अधिकारी, १४ हजार ६६९ कारकून व ६०२२ अन्य कर्मचा-यांचा समावेश आहे. तसेच पुढील आर्थिक वर्षातही बँकांमधून ३९ हजार कर्मचारी निवृत्त होतील. यात १८ हजार ५०६ अधिकारी व १४ हजार ४५८ कर्मचा-यांचा समावेश आहे.

सार्वजनिक क्षेत्रात स्टेट बॅँक, आयडीबीआयसह २२ मोठ्या बॅँका आहेत. या बँकांमध्ये मोठा प्रमाणावर रिक्त पदे निर्माण होत असून त्यामुळे सरकारने आता त्यांच्या जागी नवीन कर्मचारी निवडताना थोडी लवचिकता बाळगण्याचे ठरवले आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅँका या गरजेप्रमाणे व
व्यवसायानुसार कर्मचा-यांची भरती करीत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. २०१२-१३ या आर्थिक वर्षात सरकारी बँकांमध्ये ३६ हजार कर्मचा-यांची नवीन भरती करण्यात आली होती. यामध्ये देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेमध्ये २० हजार कारकून, तर १२०० अधिकारी स्तरावरील कर्मचा-यांची भरती करण्यात आली होती. येत्या काही वर्षांत नवीन भरतीचा सिलसिला असाच कायम राहणार आहे. बँकांचा विकास हा वेगाने होणार असून त्यातच नवीन बँकांची होणारी एंट्री यासाठी कारणीभूत ठरणार आहे. येत्या दोन वर्षात तब्बल ८० हजार कर्मचारी, अधिकारी बँकांमधून निवृत्त होणार आहेत. तसेच शाखा विस्तारामुळेही बँकांना मनुष्यबळाची मोठी गरज भासणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment