झिरो कार्बन सिटी मसदरला मोदींची भेट

masdar
संयुक्त अरब अमिरातीच्या भेटीत दुसर्‍या दिवशी मोदी यांनी जगातली पहिली झिरो कार्बन सिटी अशी ओळख मिळविलेल्या मसदर सिटीला भेट दिली. चालकाविना चालणार्‍या वाहनांतून मोदींनी या शहराची सैर केली आणि येथील वाहतूक सिस्टीमची माहितीही घेतली. शहराच्या वास्तूकाराबरोबर चर्चा केली आणि शहराच्या डिजिटल व्हिजीटर बुकमध्ये विज्ञान हेच जीवन अशी नोंदही मोदी यांनी केली.

जगातली पहिली झिरो कार्बन सिटी मसदरचा व्याप १७ किमी परिसरात पसरला असून हे शहर नवीन पद्धतीने सजविण्याचे काम सुरू आहे. २०२५ सालापर्यंत शून्य प्रदूषणाचे टार्गेट ठेवले गेले आहे. येथे पेट्रोल व डिझेलवरील वाहनांना परवानगी नाही. वीज आणि बॅटरीवर चालणारी वाहनेच येथे चालविता येतात तसेच येथे पायी चालण्याला विशेष प्रोत्साहन दिले जाते.

२००६ साली या शहराच्या उभारणीचे काम हाती घेतले गेले असून सिटी ऑफ फ्यूचर असे या प्रकल्पाचे नामकरण केले गेले आहे. त्यासाठी १.८३ लाख कोटी खर्च अपेक्षित आहे. इमारती, वाहतुकीसाठी आवश्यक वीज सोलर उर्जेतून निर्माण केली जात आहे आणि इमारती बांधताना पाणी व वीजेचा वापर ४० टक्के कमी होईल अशीच बांधणी केली जात आहे. भारतातील बी्रआरटीएस प्रमाणे येथे पीआरटीएस सिस्टीम राबविली जात आहे. म्हणजे झिरो कार्बन ट्रान्स्पोर्ट सिस्टीम व विनाचालक वाहने. ही वाहने सुरक्षित असून लिथियम बॅटरीवर चालतात. त्यात मॅग्नेटचा वापरही केलेला असतो त्यामुळे ती रस्त्यांना चिकटून चालतात असे समजते.

Leave a Comment