१५ हजार एटीएम बसविणार सरकारी बँका

atm
नवी दिल्ली : २०१५-१६ या आर्थिक वर्षात देशभरात सार्वजनिक क्षेत्रातील बँका १५ हजार नवीन एटीएम बसविणार आहेत. अर्थमंत्रालयाच्या सहकार्याने सरकारी बँकांनी एटीएम बसविण्याची योजना तयार केली आहे. ही एटीएम बहुतांशी लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात बसविण्यात येणार आहेत. अर्थमंत्रालयाने तयार केलेल्या या योजनेनुसार २७ सार्वजनिक बँकांना मार्च २०१६ पर्यंत एकूण १५ हजार ७ एटीएम बसवायची आहेत.

जनधन योजनेत आतापर्यंत १७ कोटींपेक्षा अधिक खाती उघडण्यात आली आहेत. त्याचबरोबर १५ कोटी रुपये कार्डही जारी करण्यात आली आहेत. यामुळे लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात या कार्डचा वापर वाढवण्यासाठी अधिक एटीएमची गरज भासणार आहे. याशिवाय एलपीजी, मनरेगा आणि केरोसीनवरील अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात टाकले जात आहे. त्यामुळे गावागावांमध्ये एटीएम असणे आवश्यक झाले आहे. या आर्थिक वर्षात एसबीआय २ हजार, बँक ऑफ बडोदा १९७०, पंजाब नॅशनल बँक १७००, देना बँक १२००, कॅनरा बँक १ हजार आणि आंध्र बँक १ हजार एटीएम बसविणार आहे. मार्च २०१५ पर्यंत देशभरात एकूण १ लाख २५ हजार ७९० एटीएम आहेत.

Leave a Comment