वन रँक वन पेन्शनसंबंधी १५ ऑगस्टला घोषणा?

penshion
दिल्ली- येत्या १५ ऑगस्टला लाल किल्यावर झेंडावंदनानंतर भाषण करताना पंतप्रधान मोदी वन रँक वन पेन्शन योजनेसंदर्भातील घोषणा करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लष्कराची ही दीर्घकाळची मागणी आहे आणि गेले ५८ दिवस माजी सैनिकांनी त्यासंदर्भात निदर्शने आणि आंदोलन सुरू ठेवले आहे. आंदोलकांनीही त्यांच्या मागणीवर १५ ऑगस्ट रोजी तोडगा निघत असल्याचे संकेत मिळत असल्याचे सांगितले आहे.

गेले कांही दिवस संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यात या संदर्भातील चर्चा सुरू असून त्यात कांही मुद्द्यावर सहमती झाली आहे तर कांही मुद्यांवर असहमती आहे. पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यदिनी या संदर्भातील घोषणा करतील व त्यासाठी आम्ही वाट पाहात आहोत असेही आंदोलनकर्त्यांकडून समजते.

दोन फौजी एका पदावर, समान कालावधीसाठी सेवा करून निवृत्त होताना त्यांच्या निवृत्तीमध्ये कांही वर्षांचे अंतर असेल तर दोघांना मिळणारे निवृत्तीवेतन भिन्न असते. नंतर निवृत्त होणार्‍याना नवीन पे कमिशनचा लाभ मिळतो व परिणामी त्यांचे निवृत्तीवेतन पूर्वी निवृत्त झालेल्या त्याच रँकच्या फौजी पेक्षा जास्त होते या प्रमाणात अगोदर निवृत्त झालेल्यांची पेन्शन वाढत नाही. ते समान व्हावे अशी फौजींची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मोदींनीही हा प्रश्न वाटतो तेवढा सोपा नसल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे यातून सरळ व सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी पंतप्रधानांनी सरकारातील तज्ञांना कामाला लावले असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment