पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळणे सक्तीचे

petrol
नवी दिल्ली- देशात इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यानंतर पेट्रोलियम खात्याने पेट्रोलमध्ये पुढील वर्षीपासून १० टक्के इथेनॉल मिसळणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. साखर कारखान्यांच्या निधीचा मोठा प्रश्न इथेनॉलचा वापर वाढल्याने सुटणार आहे.

पेट्रोलमध्ये सध्या पाच टक्के इथेनॉल मिसळणे सक्तीचे आहे. मात्र, तेल विपणन कंपन्या आता २ टक्के इथेनॉल मिसळत आहेत. साखर कारखान्यांना २०१५-१६ या वर्षात इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यास सांगण्यात आले आहे. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळल्यास देशाला २३० कोटी लिटर इथेनॉलची गरज लागेल, असे वरिष्ठ सरकारी अधिका-यांनी सांगितले.

साखर कारखान्यांना प्रति लिटर इथेनॉलमधून ४८ ते ४९ रुपये दर मिळतो. त्यामुळे साखरेला भाव मिळाला नाही, तरीही साखर कारखान्यांचे नुकसान टळू शकते. पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिसळण्यासाठी १३३ कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता लागते. मात्र, तेल विपणन कंपन्यांनी आतापर्यंत ८२ कोटी लिटरचीच कंत्राटे केली आहेत.

Leave a Comment