मुस्लिम युवकाने हनुमान चालिसाचा केला उर्दूमध्ये अनुवाद

abid
लखनौ – सर्व धर्म एकाच परमोच्च शक्तीचा मार्ग दाखवितात, हे वारंवार सिद्ध झालेले तत्त्व आहे. मात्र, काही लोक धर्माच्या नावाखाली दहशतीचा हैदोस घालतात. काही जण मात्र सर्वधर्मसमभावाची पताका मिरवीत नवे आदर्श घालून देतात. असाच एक युवक आहे, उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील आबिद अल्वी ! त्याने हनुमान चालिसाचा उर्दू भावानुवाद केला आहे.

त्याने हा अनुवाद उर्दू शायरीच्या ‘मुसद्दस’ या प्रकारात केला आहे. या प्रकारात सामान्यपणे सहा ओळींचे तीन शेर असतात. त्याप्रमाणे आबिदने हा अनुवाद १५ बंदमध्ये केला आहे. आबिदने आता शिव चालिसाचेही उर्दूत भाषांतर करण्याची तयारी सुरू केली आहे. ‘दोन्ही समाजाच्या लोकांनी परस्परांना समजून घ्यावे, असे मला वाटते. त्यासाठी एकमेकांची संस्कृती समजून घेणे आवश्यक आहे. हिंदीतील पुस्तके उर्दूमध्ये आणि उर्दूतील हिंदीमध्ये भाषांतरित होणे आवश्यक आहे, असे मला वाटते,’ असे आबिदने म्हटले आहे.

‘लहानपणी आईवडील मला पवित्र कुराण सोबतच त्याचा अनुवादही वाचून दाखवत असत. पण, कुराण कोणताही भेदभाव करण्याची शिकवण देत नाही,’ असे मत आबिदने व्यक्त केले. एकदा वाराणसीमध्ये काही पर्यटकांनी आपल्याला हनुमान चालिसा वाचण्याची विनंती केली. तेव्हाच आपण हे भाषांतर करण्याचा निर्णय घेतला होता, असे त्याने म्हटले आहे. हा अनुवाद करायला त्याला तीन महिन्यांचा कालावधी लागला.

Leave a Comment