देशात ४०० कोटींच्या बनावट नोटा चलनात

nakali-nota
मुंबई – नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात देशात किमान ४०० कोटी रूपयांच्या बनावट नोटा चलनात असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने इंडियन स्टॅटीस्टीकल इन्स्टिट्यूटकडून हे सर्वेक्षण करून घेतले असून या संस्थेने रिझर्व्ह बँक, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, सेंट्रल इकॉनॉमिकल इंटेलिजन्स ब्युरो, इंटेलिजन्स ब्युरो, सीबी्आय व अन्य ठिकाणांहून या संदर्भातली अधिकृत आकडेवारी गोळा करून हा अहवाल दिला असल्याचे समजते.

देशात बनावट नोटा सहजी ओळखता याव्यात यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकार नोटांच्या फिचरमध्ये सतत बदल करत असतात तरीही बनावट नोटांचे चलनातील प्रमाण वाढतच चालल्याचे दिसून आल्यानंतर हे सर्वेक्षण केले गेले. सर्वेक्षण करणार्‍या संस्थेच्या मताप्रमाणे देशात दरवर्षी ७० कोटी रूपयांच्या बनावट नोटा चलनात येतात तर इंटेलिजन्स ब्युरोच्या म्हणण्यानुसार हा आकडा २५०० कोटी इतका आहे. बनावट चलनामागे प्रामुख्याने पाकिस्तानचा हात असून अनेक नोटांचे कागद, शाई व अन्य बाबी पाकिस्तानी नोटांशी हुबेहुब जुळतात असे फोरेन्सिक तपासणीत दिसून आले आहे.

बनावट नोटांत १००० रूपयांच्या तुलनेत ५०० व १०० च्या नोटांचे प्रमाण १० टक्के अधिक असल्याचेही सांगितले जात असून बनावट नोटातील ८० टक्के नोटा आयसीआयसीआय, अॅक्सिस, व एचडीएफसी बँकेकडून पकडल्या गेल्या आहेत. गेल्या पाच वर्षात २४ ते ४६ कोटी रूपये मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्या आहेत.

Leave a Comment