तिरूपतीचा लाडू प्रसादम ३०० वर्षांचा झाला

laddu
आंध्रातील श्रीमंत देवस्थान तिरूमला तिरूपती वेंकटेश्वरच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणार्‍या लाडूंच्या प्रथेला यंदा ३०० वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणजे प्रसादम म्हणून दिला जाणारा हा लाडू ३०० वर्षांचा झाला आहे. तिरूपती देवस्थानमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २ ऑगस्ट १७१५ साली प्रथम हा लाडू प्रसाद बनविला गेला. आज हा प्रसाद इतका महत्त्वाचा बनला आहे की वेंकटेश्वराच्या दर्शनास येणार्‍या भाविकांची यात्रा लाडू प्रसाद घेतल्याशिवाय पुरीच होत नाही.

साखर, तूप, आटा, वेलदोडा, सुकामेवा व कापूर घालून बनविले जात असलेले लाडू जगभरात भाविकांच्या श्रद्धेचा विषय बनले आहेत. तिरूपतीसाठी अनेक प्रकारचे प्रसाद बनविले जातात मात्र सर्वाधिक पसंती या लाडूलाच आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडवाच्या विक्रीतून देवस्थानला प्रचंड कमाई होते. ३०० ग्रॅम वजनाचा लाडू २५ रूपयांना दिला जातो. २०१४-१५ मध्ये लंडू विक्रीतून देवस्थानला १९० कोटी रूपये मिळाल्याचे सांगितले जाते. एवढेच उत्पन्न येथे भाविक केसदान करतात त्या केसांच्या विक्रीतूनही मिळते असेही समजते.

तिरूपती लाडू हे नांव वापरून अन्य कोणी लाडू विक्री करू नये म्हणून या लाडवांचे भौगोलिक संपदा पेटंट घेतले गेले आहे.

Leave a Comment