न्यूयॉर्क : विंडोज १०मध्ये इंटरनेट एक्स्प्लोररला पर्याय असलेल्या फायरफॉक्स आणि गुगल क्रोमच्या डिफॉल्ट सेटिंग्जना स्थान न दिल्याने मॉझिलाच्या मुख्यकार्यकारी अधिकारी क्रिस बेर्ड यांनी संतापून मायक्रोसॉफ्टचे मुख्यकार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांना पत्र लिहिले आहे. या पत्रप्रपंचामुळे पुन्हा एकदा मॉझिला आणि मायक्रोसॉफ्ट आमने-सामने आले आहेत.
मायक्रोसॉफ्ट आणि मॉझिला आमने-सामने !
मॉझिला फाऊंडेशनने इंटरनेट एक्स्प्लोररला मोफत आणि सोपा पर्याय म्हणून फायरफॉक्स या ब्राऊझरची निर्मिती केली. अशाप्रकारे गुगलनेही क्रोम या
ब्राऊझरची निर्मिती केली. या दोन्ही ब्राऊझर्सनी एक्स्प्लोररला मागे टाकले आहे. मायक्रोसॉफ्टने नुकतीच विंडोजची दहावी आवृत्ती बाजारात आणली आहे. यामध्ये क्रोम, मॉझिला यासारख्या ब्राऊझर्सच्या डिफॉल्ट सेटिंग्ज उपलब्ध करून न दिल्यामुळे हे ब्राऊझर्स विंडोजच्या दहाव्या आवृत्तीत वापरण्यात अनेक अडचणी येत आहेत. विंडोज १० मध्ये संकेतस्थळावरील माहिती स्क्रोल करावयाचे असेल तर किमान दोन वेळा तरी क्लिक करावे लागते. याशिवाय अनेक छोट्या छोट्या सेटिंग्जमध्ये बदल करण्यात आल्याचे बेर्ड यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्राला उत्तर देताना मायक्रोसॉफ्टने नमूद केले आहे की विंडोज १० ही वापरकर्त्यांसाठी अधिक सोपी आणि सुलभ अशी ऑपरेटिंग प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये सुरुवातीलाच वापरकर्त्यांला त्याच्या डिफॉल्ट सेटिंग्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यावेळेस वापरकर्ता जी सेटिंग्ज निवडतो त्या सेटिंग्जच पुढे वापरल्या जातात. तरीही वापरकर्त्यांकडून तुम्ही सांगता त्याप्रमाणे तक्रारी आल्यास त्यावर विचार केला जाईल.