नासाने मंगळावर ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी बसवली अत्याधुनिक यंत्रणा

nasa
वॉशिंग्टन – मंगळ ग्रहावर ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून नासाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत ट्रॅफिक जाम मॉनिटर्स बसवले आहेत.

पाच अवकाश याने मंगळ ग्रहाच्या कक्षेत असून त्यापैकी एक यान भारताचे देखील आहे. ही याने एकमेकांना धडकू नये म्हणून नासाने एक अत्याधुनिक यंत्रणा बसवली आहे. दोन अवकाश यान एकमेकांजवळ आल्यास ही यंत्रणा लगेच सूचना देते. नासाचे मार्स अॅटमॉसफेअर अॅंड व्होलाटाइल इव्होल्युशन (माव्हेन), भारताचे मंगळयान, मार्स एक्सप्रेस, मार्स ओडिसी आणि रिकोनाइसांस ऑरबिटर ही पाच अवकाश याने मंगळाच्या कक्षेत आहेत. सध्या ही पाचही याने नासाची संपर्क आणि ट्रॅकिंग सुविधा नासा डीप स्पेस नेटवर्क वापरतात. यामुळे नासातील इंजीनिअर्सला काही आठवडे आधी कोणते यान कुठे येणार याची माहिती आधीच होते. त्यानुसार इंजीनिअर्स तेथील ट्रॅफिकचा गुंता सोडवतात. आधी ओडिसी आणि एमआरओ ही दोनच याने होती. त्यांची धडक होण्याची शक्यता कमीच होती त्यामुळे हे काम नेव्हिगेशन टीम करीत होती. आता परिस्थिती बदलली आहे. माव्हेनची कक्षा ही अंडाकृती आहे आणि इतर यानांच्या कक्षेत येते. पृथ्वीच्या कक्षेत १००० पेक्षा जास्त अवकाश याने आहेत तरीसुद्धा मंगळ ग्रहाची ट्रॅफिक मॅनेजमेंट ही जास्त गुंतागुंतीची असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. जसे मंगळ ग्रहाचा शोध घेण्याची मोहीम तीव्र होईल तसे तेथील वाहतूकही जास्त व्यस्त राहील असे नासाचे वैज्ञानिक जोसेफ गिन यांनी म्हटले.

Leave a Comment