कृत्रिम पावसात ऊन्हाचे अडथळे

rain
नाशिक- ऊन पडल्याने नाशिकमधील येवला तालुक्यातील सायगाव परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले आहेत. वातावरण अनुकूल नसल्याने हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. बाष्पयुक्त ढग तयार न झाल्याने चाचणी अपयशी ठरल्याचे सध्यातरी दिसत आहे.

या भागात पावसाने दडी मारल्याने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवला. सायगाव परिसरात आत्तापर्यंत चार रॉकेट्सने ढगांवर मारा करण्यात आला. मात्र अद्यापही पावसाचा मागमूस दिसत नसल्याने शेतक-यांसह प्रशासनाचे अधिकारीही चिंताग्रस्त आहेत.

सायगावात सर्वप्रथम सोमवारी सकाळी सात वाजता दोन रॉकेटच्या सहाय्याने ढगांवर मारा करण्यात आला. यानंतर ४५ मिनिटांत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र काहीच फरक न पडल्याने पुन्हा दोन रॉकेट्स सोडण्यात आले. याचबरोबर आणखी दोन रॉकेट्सचा ढगांवर मारा केला जाणार आहे.

आयएसपीएस ही एक खाजगी संशोधन करणारी संस्था असून कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी आयएसपीएस या संस्थेने पुढाकार घेतला आहे. रॉकेटद्वारे आकाशातील ढगांवर मारा करुन कृत्रिम पाऊस पाडला जाणार असल्याने, त्यासाठी ओझर येथून हिंदुस्तान एरोनॉटिक कंपनीतून परवानगी देण्यात आली आहे. या संस्थेद्वारे यापूर्वी रॉकेटच्या सहाय्याने सिंधुदुर्ग, सांगली या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग करण्यात आले आहेत.

या सर्व प्रयोगाचा खर्च आणि रॉकेटसाठी लागणारा खर्च ही संस्था स्वतःच करते. शासनाकडून त्यांना केवळ परवानगी देऊन स्थानिक अधिका-यांकडून मदत केली जाते.