ईपीएफओ ६ ऑगस्ट रोजी करणार शेअर बाजारात गुंतवणूक

epfo
नवी दिल्ली : आता शेअर बाजारात ईपीएफओ उतरणार असून, ६ ऑगस्ट रोजी त्यांच्या गुंतवणुकीचे पहिले पाऊल पडणार आहे. पहिल्या टप्प्यात चालू वर्षात ईटीएफमध्ये जवळपास ५ हजार कोटी गुंतवले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनी दिली.
केंद्रीय कामगार मंत्रालयाने एप्रिल महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी नव्या गुंतवणूक पॅटर्नची अधिसूचना जारी केली होती. त्यात ईपीएफओने इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित योजनांमध्ये किमान ५ ते १५ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ईपीएफओने चालू आर्थिक वर्षात आपल्याकडे जमा असलेल्या रकमेतील फक्त ५ टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्यावेळी किती गुंतवणूक करायची, हे सर्व बाजारातील स्थितीवर अवलंबून असेल, असे जालान म्हणाले. मात्र, अर्थ मंत्रालयाच्या मापदंडानुसार दरमहा वाढत जाणारी रक्कम गुंतवून ती १५ टक्क्यांपर्यंत नेली जाऊ शकते. तथापि, सेंट्रल बोर्ड ऑफ स्ट्रस्टीजने प्रारंभी ५ टक्के गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे.

एप्रिल ते जून या दरम्यान ईपीएफओची मासिक वृद्धी ८ हजार २०० कोटी रुपये आहे. त्यामुळे ईपीएफओजवळ गुंतवणुकीसाठी दरमहा ४१० कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतात. ईपीएफओने आतापर्यंत शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नाही. ईपीएफओशी संबंधित सीबीटीमधील काही कामगार संघटनेचे सदस्य चढ-उतारशी संबंधित शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास विरोध करीत आहेत. असे जरी असले, तरी ईपीएफओने शेअर बाजारात पहिले पाऊल टाकण्याचे ठरविले असून, ६ ऑगस्ट रोजी गुंतवणुकीचे पहिले पाऊल टाकले जाणार आहे. ही एक जोखीम असली, तरी निश्चितच ईपीएफओला याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे ईपीएफओच्या या भूमिकेचे अर्थतज्ज्ञांकडून स्वागत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे टप्प्याटप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार असल्याने लाभाचा अंदाजही येणे शक्य आहे.

Leave a Comment