परग्रह मानवासाठी संदेश लिहिण्याची स्पर्धा

yuti
लंडन : परग्रहावरील मानवाच्या शोधासाठी व संशोधन कार्यासाठी १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी युरी मिलनेर नामक रशियन अब्जाधीशाने दिला आहे. युरी यांनी परग्रहवासीयांना पाठवण्यासाठी संदेशलेखन स्पर्धाही घोषित केली. परग्रह मानवांसाठी (एलियन्स) सर्वोत्कृष्ट संदेश लिहिणा-याला १ दशलक्ष डॉलर्सचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे समन्वयक व परग्रह मानवावर संशोधन करणारे अवकाश संशोधक फ्रँक यांनी स्पर्धेच्या अटी सांगितल्या. मानवी भाषेत संदेश लिहिणे यात अपेक्षित नाही. अशा संदेशांना स्पर्धेत स्थान नसल्याचे फ्रँक यांनी सांगितले. फ्रँक हे परग्रहीय बुद्धिमत्तेवर १९६० पासून शोधकार्य करीत आहेत. आंतरग्रहीय संदेश पाठवण्यासाठी उपकरण तयार करण्यावर फ्रँक यांनी संशोधन केले आहे.

युरी मिलनेर यांनी निधी दिलेल्या परग्रहवासीय संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन जगप्रसिद्ध भौतिकशास्त्र संशोधक स्टीफन हॉकिन्स यांच्या हस्ते करण्यात आले. रॉयल सोसायटी ऑफ लंडनद्वारे हा प्रकल्प राबवण्यात येईल. पृथ्वीशिवाय विश्वात बुद्धिमान जिवाच्या अस्तित्वाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संशोधन प्रकल्प आहे.