राजापूरात अवतरली गंगा

ganga
मुंबई : दहा महिन्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये गंगा अवतरली असून हे वृत्त समजताच भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

राजापूरची गंगा ही सर्वसाधारणपणे तीन वर्षांनी अवतरते, पण जेमतेम दहा महिन्यांतच पुनरागमन झाल्यामुळे भाविकांमध्ये उत्सुकता आहे. गंगा परिसरातील सर्व, चौदाही कुंडांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी येत असून काशीकुंड तुडूंब भरल्यामुळे गोमुखातूनही पाण्याचा अखंड प्रवाह सुरू झाला आहे. राजापूर परिसरात सध्या पावसाचा चांगला जोर असून गंगा आगमनाचे कोणतेही पारंपरिक नैसर्गिक संकेत यावेळी न मिळाल्याचे जाणकारांनी नमूद केले.
निसर्गाचा चमत्कार मानली जाणारी ही गंगा नियमितपणे दर तीन वर्षांनी प्रकट होते. पण गेल्या काही वर्षांपासून निसर्गातील अन्य बदलांप्रमाणेच तिचेही वेळापत्रक बदल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. २०११ च्या फेब्रुवारीत प्रकट झालेल्या गंगेचे त्याच वर्षी जूनमध्ये निर्गमन झाले होते. त्यानंतर पुन्हा अवघ्या दहा महिन्यांतच, एप्रिल २०१२ मध्ये तिचे पुनरागमन झाले. पण थोडय़ाच महिन्यात निर्गमन होऊन २०१३ च्या मार्च महिन्यात ती पुन्हा प्रकटली. त्या वेळी मात्र येथील वास्तव्याचा नवा विक्रम प्रस्थापित करीत सप्टेंबर २०१४ पर्यंत ती प्रवाही राहिली.

Leave a Comment