शेतकरी आणि नागरी समाजाचा संवाद : अमृतवर्षा

farmer
पुणे – भारताला आजही कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जात असले तरीही शहरातील जनता आणि खेड्यातील विशेषत: शेतकरी वर्ग यांच्यामध्ये मोठे अंतर असलेले दिसून येते. ही परिस्थिती बदलून शेतकरी आणि शहरी नागरीक यांच्यात सुसंवाद प्रस्थापित व्हावा आणि कृषी आधारित जीवनशैलीची, त्यातील आव्हानांची नागर समाजाला जाणीव व्हावी; यासाठी पुण्यातील विख्यात वकील नंदू फडके यांच्या पुढाकाराने अमृतवर्षा महोत्सव हा उल्लेखनीय उपक्रम राबविला जात आहे.

देशात सर्वाधिक वेगाने वाढणा-या पुणे परिसरालगत वेल्हा, मावळ, पुरंदर, भोर अशा तालुक्यांमध्ये शेती करण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र खेडेगावातून शहराकडे स्थलांतराचे प्रमाण वाढल्याने शेतीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शेतीच्या कामांचा खोळंबा होऊन त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यावर उपाय म्हणून वेल्हा तालुक्यात भात लावणीच्या काळात पुणे परिसरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे, स्वयंसेवी संस्थांचे आणि कौटुंबिक, मित्रांचे गट घेऊन प्रत्यक्ष शेतावर जायचे आणि त्यांच्या मदतीने भाताची लागवड करायची; यामधून अमृतवर्षा महोत्सव या उपक्रमाची सन २०१२ च्या भात लावणीच्या हंगामात सुरुवात झाली. आता या वर्षी उपक्रमाच्या चौथ्या वर्षी नाशिकमधील द्राक्ष बागांमध्ये तोडणीसारख्या कामासाठी असा उपक्रम सुरू करण्याची मागणी होत आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात शहरातील तरुणाईला वेध लागतात ते ते वर्षा सहलीचे! भाताची लागवड प्रामुख्याने अधिक पावसाच्या क्षेत्रात केली जाते. भाताच्या लागवडीचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव असे पीक आहे की ज्याची दोनदा लागवड करावी लागते. सुरुवातीला बियाणे रुजवून भाताची रोपे तयार केली जातात आणि त्यानंतर त्या रोपांची पुन्हा दुस-या ठिकाणी लावणी केली जाते. ती देखील पावसाच्या दिवसात व्हावी लागते. अन्यथा रोपे सुकून जाण्याची भीती असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आवश्यक असते. त्यामुळे शहरातील युवक, युवतींचे गट हंगामातील प्रत्येक रविवारी वेल्हा परिसरातील भातशेतीमध्ये जाऊन भात लावणीचे काम या महोत्सवांतर्गत करीत आहेत. ‘एक दिवस शेतीसाठी; शेतक-यांच्या मदतीसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन पुण्यातील बीएमसीसी, मराठवाडा मित्रमंडळ, ज्ञान प्रबोधिनी, हुजूरपागा,फर्गसन, मॉडर्न, एमआयटी, डी वाय पाटील, आपटे प्रशाला अशी महाविद्यालये, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, बारामती होस्टेल, स्वरूपवर्धिनी अशा अनेक महाविद्यालयांचे, संस्थांचे गट यासह अनेक खाजगी गट या उपक्रमात सहभागी होत आहेत. सुरुवातीला केवळ १४६ जणांच्या सहभागाने सुरू झालेल्या या महोत्सवात यावर्षी अडीच हजाराहून अधिक जणांनी सहभाग घेतला आहे. याशिवाय सध्या केवळ वेल्हा तालुक्यापुरता मर्यादित असलेला हा उपक्रम इतर परिसरांनाही खुणावत आहे.

या उपक्रमात केवळ ज्यांच्याकडे साधनसामुग्री आणि मनुष्यबळ नाही; अशा शेतक-यांनाच ही सेवा उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमात सहभागी झालेल्यांनाही केवळ मौजमजेच्या वर्षासहलीच्या आनंदापलीकडचा निर्भेळ सृजन प्रक्रियेत सहभागी झाल्याचा आनंद प्राप्त होतो. या तात्कालिक बाबींपेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे शेतक-यांच्या जीवनाची नागरी समाजघटकांना ओळख होते. त्यामुळे संगमरवरी मनो-यात बसून शेतकरी व्यसनामुळे, प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या करतात, शेतक-यांना आयकर का नाही, शेतक-यांना सवलती हव्यात कशाला, शेतक-यांनाच कर्ज, व्याजमाफी का; असे सवाल करण्यापूर्वी वस्तुस्थितीचा वस्तुनिष्ठ विचार करण्याची बुद्धी होण्याची मिळणारी क्षमता अधिक महत्वाची आहे.

Leave a Comment