बॉसी मांजर- कम्युनिकेशन मॅनेजर

boss
रूमानियन ऑनलाईन गिफ्ट स्टोअर कॅट बॉक्सच्या कार्पेरेट मॅनेजरपदावर नुकतीच बॉसी या मांजराची नेमणूक करण्यात आली असून त्याला दर महिना १३ हजार रूपये पगार दिला जाणार आहे शिवाय कॅट फूट साठी अलौन्सही. वाचून नवल वाटेल मात्र ही सत्य घटना आहे. बॉसीने जवळच्या ७०० स्पर्धक मांजराशी कडी स्पर्धा करून या पदावर आपली वर्णी लावली आहे. गेल्याच महिन्यात बॉसी कामावर रूजू झाले आहे.

बॉसी हे ब्ल्यू स्कॉटिश फोल्ड मांजर त्याच्या खास नारिंगी रंगांच्या डोळ्यासाठी प्रसिद्ध आहे. खाली वळलेले कान, सुंदर मऊ फर अशी त्याची अन्य सौंदर्यस्थळे. त्याच्याकडे जबाबदारी आहे ती व्हीडीओत व्हाईसओव्हर करून जाहिराती करणे, फोटोसेशन करणे. त्याचबरोबर स्टोअर मधून खरेदी केलेल्या मालावर पंजाचा शिक्का डिलिव्हरी देण्यापूर्वी उठविणे. दुकानाचा मालक अलेक्झांडर कोसॅक सांगतो, ज्या दिवशी बॉसी कामावर हजर होणार होते, तेव्हा त्याला आणण्यासाठी लिमोसिन कार पाठविली गेली होती आणि बॉसीही सूट परिधान करून कामावर हजर झाले. आल्याआल्या त्याने संगणक चेक केला. बॉसी केवळ नऊ महिन्यांचे आहे.

अर्थात मांजराला कामावर ठेवण्याची जगातली ही पहिलीच घटना नाही. जपानमधील तामा मांजरीची नेमणूकही एका पिटुकल्या रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्तर म्हणून केली गेली होती आणि तामाने १६ वर्षे ही जबाबदारी पार पाडल्यानंतर तिचे नुकतेच निधन झाले. या १६ वर्षाच्या कारकीर्दीत तामाने हे स्टेशन इतके लोकप्रिय केले की तिला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असत व त्यामुळे या गावाची आर्थिक स्थिती कमालीची सुधारली होती.