राष्ट्रीय गुन्हे विभागाची धक्कादायक माहिती; महिलांपेक्षा पुरूषांच्या आत्महत्या दुप्पट

quit
नवी दिल्ली : राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने नुकतीच विवाहित महिलांच्या तुलनेत विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली आहे. तथापि, पत्नीचा मृत्यू झाल्यास किंवा तिच्यापासून घटस्फोट झाल्यास पुरुषांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले असल्याचे या अहवालात नमूद आहे.

सर्वच राज्यांकडून राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने प्राप्त केलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. यात असे नमूद आहे की, २०१४ मध्ये ६० हजार विवाहित पुरुषांनी आत्महत्या केल्या असून, याच वर्षात विवाहित महिलांच्या आत्महत्यांची सख्या २७ हजार इतकी आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पुरुषांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. २०१४ मध्ये १४०० विधुरांनी आत्महत्या केल्या, तर पतीच्या मृत्यूनंतर आत्महत्या करर्णाया महिलांची संख्या १३०० इतकी आहे. घटस्फोटानंतरच्या आत्महत्यांमध्येही पुरुषांचीच संख्या जास्त आढळली आहे. त्याचप्रमाणे घटस्फोट झाल्यानंतर पुरुषांनी मृत्यूला कवटाळण्याचे प्रमाण ५५० असून, घटस्फोटित महिलांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण ४१० इतके आहे. काही वर्षे आधी पत्नीच्या विरहाने आत्महत्या करणा-या पुरुषांची संख्या फार जास्त होती. पण, २०१४ या वर्षात हे प्रमाण बरेच कमी झाले असल्याचे यात दिसून आले आहे. या वर्षात आत्महत्या करणा-या एकूण पुरूषांपैकी ६६ टक्के पुरुष हे विवाहित आणि २१ टक्के पुरूष अविवाहित होते. तर, घटस्फोटित आणि विधुर किंवा विधवांच्या आत्महत्यांचे प्रमाण केवळ तीन टक्केच आहे, असेही अहवाल सांगतो.

Leave a Comment