न्यू वर्ल्ड वेल्थचा अहवाल; परदेशात आहेत ६१ हजार भारतीय कोट्यधीश

indian
नवी दिल्ली : गेल्या १४ वर्षांच्या काळात भारतातील सुमारे ६१ हजार कोट्यधीश नागरिक करविषयक जाचक अटी, सुरक्षा आणि मुलांना उच्च शिक्षण देण्याची इच्छा यासह विविध कारणांमुळे आपली मातृभूमी सोडून ते विदेशात स्थायिक झाले आहेत, अशी माहिती एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आली आहे.

हा अहवाल न्यू वर्ल्ड वेल्थ आणि एलआयओ ग्लोबल या आंतरराष्ट्रीय संस्थांनी संयुक्तपणे तयार केला असून विसावे शतक संपून एकविसावे शतक सुरू झाल्यानंतर आपली मातृभूमी सोडून इतर देशात राहायला जाण्याचे आणि दुहेरी नागरिकत्व स्वीकारण्याचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. २००० ते २०१४ या कालावधीत सुमारे ६१ हजार कोट्यधीश भारत सोडून विदेशात राहायला गेले आहेत. या यादीत चीन प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या १४ वर्षांच्या काळात ९१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी चीनच्या भूमीतून पाय काढून विदेशात वास्तव्य करणे स्वीकारले आहे.

भारत सोडून गेलेल्या बहुतांश कोट्यधीश नागरिकांनी दुबई, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांची वास्तव्यासाठी निवड केली आहे. तर चिनी नागरिकांनी अमेरिका, हॉंगकॉंग, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरात यासारख्या देशांना पसंती दिली आहे. दुर्सया देशातून आलेल्या नागरिकांनी ब्रिटनमध्ये वास्तव्य करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या १४ वर्षांत विविध देशांमधील १.२५ लाख नागरिक ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आहेत. याशिवाय, फ्रान्समधून ४२ हजार, रशियातून २० हजार, इंडोनेशियातून १२ हजार, दक्षिण अफ्रिकेतून आठ हजार आणि इजिप्तमधून सात हजार नागरिकांनी आपला देश सोडून विदेशात वास्तव्य करणे पसंत केले आहे, असेही या अहवालात नमूद आहे.करविषयक जाचक अटी, सुरक्षा आणि पाल्यांच्या उच्च शिक्षणाच्या निमित्ताने भारतातून परदेशात जाणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. साहजिकच याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतो आहे. परदेशात जे उच्च शिक्षण मिळते, सुरक्षा आणि सुविधा मिळते तशी भारतात उपलब्ध करून देणे हे केंद्र सरकारचे काम आहे. पण तसे होताना दिसत नाही. म्हणूनच परदेशात जाणा-यांची संख्या वाढते आहे.