ताजमहालला यमुनेच्या प्रदूषणाचा धोका

tajmahal
नवी दिल्ली – प्रेमाचे प्रतीक आणि जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या आग्रा येथील ऐतिहासिक ताजमहालला वाढत्या प्रदूषणाचा विशेषत: पूर्णपणे प्रदूषित झालेल्या यमुना नदीमुळे धोका निर्माण झाला आहे, अशी चिंता व्यक्त करणारा अहवाल संसदीय समितीने सादर केला आहे.

काँग्रेसचे खासदार अश्‍वनीकुमार यांच्या अध्यक्षतेखालील विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण व वन यावरील समितीने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की, ताजमहालचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आणि या जगप्रसिद्ध वास्तूला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी ताजमहाल परिसरातच योग्य जल व्यवस्थापन करण्याची गरज आहे.

स्थानिक प्रशासन ताजमहालचे रक्षण करण्याबाबत गंभीर नसल्याचा ठपका ठेवतानाच, समितीने या परिसरातील चामड्यांच्या उद्योगांवरही ताशेरे ओढले आहे. गेल्या आठवड्यात समितीने आपला अहवाल संसदेत सादर केला होता. यमुनेचे पात्र दिवसेंदिवस घाणेरडे होत असताना, प्रशासन मात्र हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. या नदीत उद्योगांकडून सांडपाणीही मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे, याकडेही समितीने लक्ष वेधले. ताजमहालचे पूर्वीचे सौंदर्य परत आणण्याकरिता द्रवरूप व घनरूप टाकावू पदार्थांचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे. याशिवाय, आग्रा महापालिकेच्या हद्दीतील कचरा योग्य पुनर्प्रक्रिया केल्याशिवाय यमुनेत टाकला जाऊ नये, यमुनेत जनावरांच्या मुक्त विहारावरही पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशा शिफारशीही समितीने केल्या आहेत.

Leave a Comment