फेसबूक-ट्विटरला करा बाय-बाय, नाहीतर गमावून बसाल मानसिक-बौद्धिक क्षमता

facebook
टोरांटो – आधुनिक युगात फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्‌सचा सर्व जगातच मोठ्या प्रमाणात उपयोग होत असून आजची तरुणाई तर या सोशल मीडियावर फिदाच आहे. तरुणच नव्हेत तर किशोरवयीन मुले-मुलीदेखील फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. बर्‍याचदा मुले अभ्यास व खेळ सोडून फेसबुकवर दिवसभर ‘पडलेले’ असतात.

पण, मुलांनो सावधान… तुम्ही दोन तासांपेक्षा अधिक काळ फेसबुकवर घालवत असाल तर आताच जागे व्हा. शास्त्रज्ञांनी केलेल्या नवीन संशोधनानुसार अधिक काळ फेसबुक-ट्विटर वापरल्याने मुलांमध्ये तीव्र नैराश्य येऊ शकते. एवढेच नव्हे, तर त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात आणि त्यांना मानसिक विकारही जडू शकतात. एवढेच नव्हे तर त्यांची बौद्धिक आणि आकलन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. तेव्हा आपली मानसिक आणि बौद्धिक क्षमता टिकून राहण्यासाठी किशोरवयीन मुलांनी फेसबूक-ट्विटरपासून दूरच राहिले पाहिजे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

जे किशोर व किशोरी प्रदीर्घ काळ सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर सर्फिंग करतात, त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते आणि यासाठी त्यांना मदत अर्थात समुपदेशनाची गरज आहे, असेही संशोधकांनी म्हटले आहे. हे नवीन संशोधन म्हणजे पालकांसाठी एक धडाच आहे. त्याबरोबरच मानसपोचार तज्ज्ञांना यामुळे सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रिय राहण्याची संधीही उपलब्ध करून दिली आहे.

कॅनडामधील ओटावा पब्लिक हेल्थ या संस्थेच्या ह्युग्युस सांपसा कयिंगा आणि रोझमंड लुईस यांनी सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सर्वेक्षण व अध्ययन केले. ऑण्टेरियो आणि अन्य आरोग्यविषयक संस्थांनी मुलांना सोशल मीडिया संबंधी विविध प्रश्‍न विचारले. ज्या मुलांना नैराश्य आले होते, ज्यांच्या मानसिक एकाग्रतेवर व बौद्धिक क्षमतेवर परिणाम झाला होता आणि ज्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते ती सर्व मुले दोन तासांहून अधिक वेळ फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम व अन्य साईट्‌सवर वेळ घालवत असल्याचे स्पष्ट झाले. या मुलांची टक्केवारी २५ होती. ज्यांच्यात ही नकारात्मक लक्षणे आढळून आली नाहीत ती मुले सोशल मीडियावर अधिक वेळ घालवत नव्हती.

या संदर्भात कॅलिफोर्नियाच्या सॅन्डियागो येथील इंटरऍक्टिव्ह मीडिया इन्स्टिट्युटच्या ब्रॅण्डा वीडरहोल्ड यांनी सांगितले की, काही जणांसाठी सोशल मीडिया म्हणजे आनंद व समाधानाची बाब असली तरी बर्‍याच जणांसाठी त्याचा वापर त्रासदायक व मानसिक तणाव वाढणारा ठरला आहे. तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांनीही सोशल मीडियात सक्रिय राहून मुलांचे समुपदेशन केले पाहिजे. हे संशोधन सायबर सायकॉलॉजी बिहेव्हियर ऍण्ड सोशल नेटवर्किंग जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment