सर्वात श्रीमंत दाम्पत्य आहे बिल, मेलिंडा गेट्‌स

bill-gates
न्यूयॉर्क – मायक्रोसॉफ्ट या विश्‍वविख्यात कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्‌स व त्यांच्या पत्नी मेलिंडा हे जगातील सर्वात श्रीमंत दाम्पत्य ठरले असून, या जोडप्याकडे एकूण ८५.७ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

मायक्रॉफ्टचीच कर्मचारी असलेल्या मेलिंडा यांच्याशी बिल गेट्‌स यांनी १९९४ मध्ये विवाह केला. डोळे दीपवून टाकणार्‍या एवढ्या मोठ्या संपत्तीचे मालक असलेल्या गेट्‌स दाम्पत्याने सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून कृषी विकास, आरोग्य, शिक्षण आणि इतर क्षेत्रात कार्य करण्यासाठी बिल ऍण्ड मेलिंडा गेट्‌स फाऊंडेशनची स्थापना केली. सध्या गेट्‌स दाम्पत्याकडे ५४,४७,९४,४७,१५,००० रुपयांची संपत्ती आहे. संपत्तीचे मूल्यांकन करणार्‍या वेल्थ एक्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये हे दाम्पत्य वॉरेन बफेट यांच्यासोबत ‘गिव्हिंग प्लेज’ या अभियानाशी जोडले गेले. जगातील सर्वात श्रीमंत लोकांना आपल्या संपत्तीचा मोठा वाटा परोपकारासाठी देण्यास प्रेरित करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.

स्पेनचे व्यावसायिक ऍण्टिगा गालोना व त्यांच्या पत्नी फ्लोरा पेरेज ७०.७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसर्‍या स्थानावर आहेत. ऍण्टिगा यांनी २००१ साली फ्लोरा यांच्यासोबत विवाह केला होता आणि सध्या ते अमान्सियो ऑर्टेगा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष आहेत. फेसबुकचे सह-संस्थापक ३१ वर्षीय मार्क झुकेरबर्ग व त्यांची ३० वर्षीय पत्नी प्रिसीलिया चान या दाम्पत्याचाही वेल्थ एक्सच्या यादीत समावेश असून, हे जोडपे या यादीत नवव्या स्थानावर आहे. या दाम्पत्याकडे ३८.५ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. 

Leave a Comment