दुबईला जाणार १ लाख रूपये किलोचा मकाईबारी चहा

makaibari
दार्जिलिंगमधील कांही जुन्या टी इस्टेटमधील एक असलेल्या मकाईबारी टी इस्टेटवरील चहाला गतवर्षी किलोला १ लाख ११ हजाराची विक्रमी किंमत मिळाल्यानंतर आता हा चहा यावर्षी दुबईत पाठविला जाणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे कॉफीचे अधिक प्रेम असलेल्या दुबईकरांना या चहानेही वेड लावले आहे आणि त्याला चांगली मागणीही येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दुबईत प्रिमिअम क्वालिटीच्या चहाची मागणी सतत वाढत चालली आहे. त्यामुळे मकाईबारी टी कंपनीची दुबईच्या फूड चेन बतील बरोबर करार करण्यासंदर्भातली चर्चा सुरू आहे. टी कंपनीचे संचालक रूद्र चटर्जी म्हणाले, आम्ही नवीन पोर्टल लाँच केले आहे आणि त्या माध्यमातून ग्राहक थेट चहामळ्यातून चहा खरेदी करू शकणार आहेत. या पोर्टलला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. गतवर्षी या चहाला विक्रमी किंमत मिळाली होती आणि जपान, ब्रिटन व अमेरिकेतील चहा आयातदारांनी मोठ्या प्रमाणावर हा चहा आयात केला होता.

दार्जिलिंगच्या कुरसियोंग भागात असलेली ही टी इस्टेट १८५९ साली सुरू झाली असून दरवर्षी येथून १ लाख किलो चहाचे उत्पादन केले जाते.

Leave a Comment