केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे संशोधन; आता एका गोळीने ओळखता येणार कॅन्सर

cnacer
लंडन – नागरिकांच्या जिवाचा कॅन्सर अथवा कर्करोग या शब्दाचा उच्चार जरी केला तरी थरकाप होतो. अनेकदा तर केवळ रोगाच्या प्रमाणापेक्षा केवळ त्याच्या दहशतीनेच रुग्ण हाय खाऊन मृत्युमुखी पडतो. बर्‍याचदा कॅन्सर तिसर्‍या स्टेजमध्ये गेल्यानंतर त्याचे निदान होते. त्यामुळे डॉक्टरांनी कसोशीने प्रयत्न करूनही रुग्णाचा जीव वाचविणे अवघड होऊन बसते. पहिल्या टप्प्यात कॅन्सर ओळखणे हे वैद्यकशास्त्रापुढे मोठेच आव्हान होते. मात्र, आता केवळ एका गोळीच्या साह्याने प्रारंभिक स्वरूपाचा कॅन्सर ओळखता येणे डॉक्टरांना शक्य होणार आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तारेच्या साहाय्याने गोळी देण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे. या तंत्रानुसार आता बायोप्सी न करताही प्रारंभिक टप्प्याचा कॅन्सर ओळखता येऊ शकणार आहे.

कॅन्सरची अवस्था, तसेच घशाचा कॅन्सर ओळखणे या नवीन तंत्रामुळे शक्य होईल. एवढेच नव्हे तर अनुवंशिक परिवर्तनामुळे रुग्णाच्या शारीरिक स्थितीत होणारे बदलही कळणार असून यामुळे रुग्णावर अधिक प्रभावी पद्धतीने उपचार करणे डॉक्टरांना शक्य होणार आहे. घशाचा व अन्ननलिकेचा कॅन्सर ओळखण्यास हे तंत्र उपयोगी ठरणार आहे. अन्ननलिकेबाबत ही अडचण असते की ती अतिशय मऊ आणि फक्त १० सेमी एवढीच असते, असे केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ रिबेका फिटझेगाराल्ड यांनी सांगितले. त्यामुळे अन्ननलिकेचा कॅन्सर ओळखणे हे डॉक्टरांपुढे आव्हानच असते. मात्र, नवीन तंत्रानुसार आधी रुग्णाला ही गोळी दिली जाते. ती विरघळल्यानंतर या गोळीचे स्पंजमध्ये रूपांतर होते. यानंतर संबंधित पेशी एकत्रित करून गळ्याचे आवरण ओढून घेण्यात येते. जर रुग्णाला कर्करोग असल्यास अन्ननलिकेच्या पेशींचा आकार बदलू शकतो किंवा वाढूही शकतो. आणि तसे झाल्यास प्रारंभिक अवस्थेतील (फर्स्ट स्टेज) कर्करोगाचे निदान होऊ शकते. केंब्रिज विद्यापीठाच्या चमूने गेल्या तीन वर्षात एकूण ७३ रुग्णांचे नमुने घेतले आहेत. या नवीन तंत्रामुळे कॅन्सरची व्यापकता समजण्यास त्यांना मदत झाली आहे. यात रोगाचे स्वरूप बदलल्यास डीएनएचा एक घटक दुसर्‍यात रूपांतरित झाल्यास कॅन्सरच्या ‘फिंगरप्रिंट’ मिळतात. आणि यामुळे रुग्णाची व्यक्तिगत अनुवांशिक माहिती मिळण्यास मदत होते. गुणसूत्रे स्थानांतरित केल्यानंतर संबंधित रुग्णाला कर्करोग झाला आहे अथवा नाही, हे नवीन तंत्रज्ञानामुळे शक्य होते. सध्या अन्ननलिकेचा व घशाच्या कॅन्सरचे प्राथमिक निदान करता येणे शक्य असून अन्य सर्वच कॅन्सरचे निदान करण्याबाबतही हे तंत्र विकसित करण्यात येणार आहे.