आजपासून ६ ऑगस्टपर्यंत कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन बंद

mahalaxmi-temple
कोल्हापूर: कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मूर्तीवर आज पासून रासायनिक संरक्षणाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ही प्रक्रिया सलग सोळा दिवस सुरू राहणार असून या दरम्यान विविध धार्मिक विधी होणार आहेत. ६ ऑगस्टपर्यंत अंबाबाईचे दर्शन रासायनिक संवर्धनाच्या कामामुळे भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. देवीचे दर्शन बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे मंदिर अतिशय प्राचीन असून वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेले या पुरातन मंदिराचा पुरातत्त्व खात्याच्या संरक्षित वास्तूमध्ये समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेली महालक्ष्मीची पाषाणमूर्ती आहे. ही मूर्ती साडेतीन फूट उंचीची आहे. या मूर्तीवर १९५५ मध्ये वज्रलेप करण्यात आला होता. महालक्ष्मीच्या मूर्तीवर शेकडो वर्षांपूर्वीपासून पंचामृताचा अभिषेक घातला जात आहे.

मूर्तीवर सततच्या अभिषेकातील रासायनिक घटकांमुळे परिणाम झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या मूर्तीवर दिवसातून फक्त एकदाच अभिषेक घातला जातो. पण तरीही या मूर्तीची झीज होऊ लागली आहे. ही झीज थांबवण्यासाठी मूर्तीवर रासायनिक संवर्धन करण्याचा निर्णय झाला आहे.

वज्रलेपाची सर्व प्रक्रिया सहा ऑगस्टपर्यंत पूर्ण झाल्यानंतर ७ ऑगस्टला पूर्ववत दर्शन व्यवस्था सुरू होईल. दरम्यानच्या काळात मूळ मूर्तीसमोर पडदा राहणार असून मंदिरातील चांदीच्या उंबऱ्याजवळ उत्सवमूर्ती आणि प्राणतत्त्व कलश दर्शनासाठी ठेवला जाईल. पितळी उंबऱ्यापासून दर्शनाची व्यवस्था केली आहे. या काळात भाविकांचे कोणतेही अभिषेक होणार नाहीत.

Leave a Comment