मधुमेहाच्या औषधांच्या किंमतीत होऊ शकते कपात

medicine
नवी दिल्ली – मधूमेह रुग्णांची संख्या देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे साहजिकच मधुमेहावरील औषधांची मागणीही त्याच प्रमाणात वाढत आहे. औषधांच्या किमती जास्त असल्या तरी ती घेणे क्रमप्राप्त असल्याने ग्राहकांकडे ती खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, आता या महागड्या औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता दाट शक्यता आहे.

त्यासोबतच, जंतूसंसर्ग, वेदनाशामक तसेच पचन विकाराशी संबंधित औषधांच्या किमतीतही घट होणार आहे. औषधांचे दर नियंत्रित करणार्‍या राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) दर नियंत्रित करण्याविषयीचे निर्देश जारी केले आहेत. सिप्रोफ्लोक्सेसिन हाइड्रोक्लोराईड, सेफोटेक्सिम, पॅरासिटामॉल, डॉमपेरिडोन, मेटाफॉर्मिन+ग्लिमपिराईड आणि ऐमोक्सिलीन+पोटॅशियम क्लॅवूलानेट यासारखी औषधे एनपीपीएने समाविष्ट करून घेतली आहेत. ही औषधे अबॉट, ग्लॅक्सोस्मिकेलाईन, ल्युपिन, कॅडिला हेल्थकेअर, आईपीसीए आणि सन्स या कंपन्यांच्या माध्यमातून विकली जातात. तज्ज्ञांच्या मते, या औषधांची मागणी सुमारे १,०५४ कोटी रुपयांच्या घरात आहे. एनपीपीएने सुमारे ३५ फॉर्म्युलेशन्ससचे दर नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ३-४ औषधांच्या दरांवर संशोधन चालू आहे, अशी माहिती रसायन आणि खते मंत्रालयातील औषध विभागातील अधिकार्‍याने दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आवश्यक औषधांचे दर नियंत्रित करण्यासाठी धोरण निश्‍चित करण्यावर भर देण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनेनंतर दुसर्‍याच दिवशी एनपीपीएने किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment