आरबीआयचे आवाहन; नोटांवर लिहू नका

rbi
नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा सामान्य नागरिकांनी किंवा संस्थांच्या प्रतिनिधींनी कागदी नोटांवर कोणत्याही प्रकारचे लिखाण करू नये, असे आवाहन केले आहे. बँकेच्या निर्देशांनुसार, नोटेवर असलेल्या ‘वॉटरमार्क विंडो’ या मोकळ्या जागेवर काहीही लिहू नये.

या मोकळ्या जागी थोडासा प्रकाश टाकल्यास गांधीजींचा फोटो बघता येऊ शकतो. खर्‍या आणि बनावट नोटा ओळखण्यासाठी ही महत्त्वाची खूण असल्याचे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. लोक नोटा मोजताना विसर पडू नये, यासाठी खूण करतात किंवा स्वत:चे नाव किंवा काही संदेश लिहितात. या मोकळ्या जागेचे वैशिष्ट्य बघता, अशा खोडसाळपणामुळे नोटांच्या सुरक्षेचे मापदंड कमकुवत होतात, असे बँकेने म्हटले आहे. ‘वॉटरमार्क विंडो’मध्ये केलेल्या खुणांमुळे ही विशेषता झाकली जाते आणि बनावट नोटा ओळखणे कठीण होते. हे एक महत्त्वाचे ‘सिक्युरिटी फिचर’ असल्याचा पुनरुच्चार आरबीआयने केला आहे.

Leave a Comment